सहा वर्षांची ऋचा सुशांत झेंडे सांगली-हरिपूर रस्त्यावरील काळी वाट भागात कुटुंबासोबत राहत होती. रात्री 11 वाजताच्या सुमारास ती आपल्या काकासोबत दुचाकीवरुन घरी निघाली. यावेळी चौकात ते वळत असताना हरिपूरकडे जाणारा एक ट्रक भरधाव वेगाने येत होता. ट्रकचालकाला वेग नियंत्रित करता न आल्यामुळे त्याने दुचाकीला उडवलं.
धडकेत ऋचा रस्त्यावर आदळली, तर तिचा काका दुसऱ्या बाजूला पडला. पुढे जाऊन ट्रकने आणखी एकाला धडक दिली आणि तो पुढच्या कमानीवर धडकून रस्त्याच्या कडेला थांबला. हा प्रकार समजताच संतप्त जमावाने ट्रकचालकाला बाहेर खेचलं आणि बेदम मारहाण केली.
काही तरुणांनी ऋचाला सांगली सिविल रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. हे समजताच जमावाने चालकाला आणखी बेदम मारहाण केली. त्यात तो बेशुद्ध झाला. या प्रकारामुळे सांगली-हरिपूर रोडवर तणाव निर्माण झाला होता. हा प्रकार समजतात ग्रामीण आणि शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जमावाला हटवून ट्रकचालकाला सांगली सिविल रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. परंतु त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला होता.