मुंबई : शिर्डीच्या साई मंदिरात प्रवेश करतेवेळी पालकांना एक वर्षाच्या आतील बाळांची ओळख गेटवरील रजिस्टरमध्ये करावी लागणार आहे. शिर्डी साई मंदिराजवळील गुरुस्थान येथील दानपेटीजवळ एका महिलेने सहा महिन्यांच्या मुलीस बेवारस सोडून गेल्याच्या घटनेनंतर साईबाबा संस्थानने हा निर्णय घेतला आहे.


काल (शुक्रवारी) सकाळी 6 वाजता एक अज्ञात महिला गेट क्रमांक 4 मधून मंदिरात मुलीला कड्यावर घेऊन प्रवेश केला. त्यानंतर गुरुस्थान मंदिराच्या दानपेटीजवळ गर्दीचा फायदा घेत मुलीला तेथेच सोडून गेट क्रमांक 3 ने बाहेर पडत असल्याच साईबाबा मंदिर परिसरातील विविध सीसीटीव्हीत स्पष्टपणे दिसत आहे.


दरम्यान साई संस्थानने या चिमुकलीची रुग्णालयात प्राथमिक तपासणी करुन तीची रवानगी पोलिसांमार्फत अहमदनगर येथील चाईल्ड लाईन या संस्थेत केली आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आता पोलीस सदर महिलेचा शोध घेत आहेत.


साई मंदिर परिसरात येण्या-जाण्यासाठी एकूण 5 गेट आहेत. संस्थानच्या दर्शनबारी व्यतिरिक्त अनेकदा 3 नंबर आणि 4 नंबर गेटने स्थानिक भाविक आणि इतर भाविक मंदिर परिसरात प्रवेश करतात. याठिकाणी सीसीटीव्ही असले तरी त्यांची ओळख पटवणे अवघड जाते. यावर उपाय म्हणून आता एक वर्षाच्या आतील बाळास साई मंदिरात नेताना पालकांना त्यांच्या ओळखीकरिता गेटवरील रजिस्टरमध्ये नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक अनिवार्य करण्यात आला असून संस्थानने आजपासून याची अंमलबजावणी सुरू केली आहे.