Truck Driver Strike : केंद्रीय गृहसचिवांशी झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसनं ट्रक आणि टँकरचालकांना त्यांचा देशभरातला संप मागे घेण्याचं आवाहन केलं आहे. हिट अँड रन (Hit and Run) प्रकरणातल्या कायद्यात नव्या तरतुदी तूर्तास लागू होणार नाहीत, असं आश्वासन केंद्रीय गृह खात्याकडून देण्यात आलं आहे. त्यामुळं ट्रक मालकांच्या संघटनेकडून ट्रक आणि टँकरचालकांना संप मागे घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. आता ट्रक आणि तुमच्या गाड्या चालवा, असं आवाहन मालक संघटनेच्या वतीनं करण्यात आलं आहे. 


मुंबईत पहाटेपासूनच पेट्रोल पंपांवर इंधन भरण्यासाठी गर्दी


मुंबईत आज पहाटेपासूनच पेट्रोल पंपांवर पेट्रोल आणि डिझेल भरण्यासाठी वाहनचालकांनी गर्दी केली आहे. ट्रान्सपोर्ट युनियनने जरी आपल्या संप मागे घेतला असला तरी मुंबईत काही ठिकाणी काल दिवसभर लोकांमध्ये गैरसमज पसरल्यामुळे पेट्रोल पंपांवर रांगा लागलेल्या दिसल्या. काही ठिकाणी  साठा संपल्यामुळे पेट्रोल पंप बंद आहेत तर काही ठिकाणी पेट्रोल पंपांवर आज साठा आहे. मात्र पहाटेपासूनच आजही मुंबईकरांनी डिझेल आणि पेट्रोल भरण्यासाठी रांगा लावल्या आहेत. 


नागपुरात परिस्थिती काय? 


नागपूर शहरातील 75 टक्के पेट्रोल पंप कोरडे ठाक झाले आहेत आणि आज रात्रीपर्यंत उर्वरित 25 टक्के पेट्रोल पंप ही कोरडे होण्याची भीती आहे. विदर्भ पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष अमित गुप्ता यांनी माहिती दिली. तर दुसरीकडे प्रशासनाकडून पोलीस सुरक्षेत पेट्रोल टँकर्स डेपोमधून आवश्यक ठिकाणी पाठवण्याचे प्रयत्न केले जात आहे. 


इंधन असेपर्यंत सेवा देणार, महाराष्ट्र स्कूल बस असोसिएशनची भूमिका


मालवाहतूकदारांनी संप जरी मागे घेतला असला तरी सलग दोन दिवसांच्या संपामुळे राज्यात अनेक भागात इंधनाचा तुटवडा आहे. संपाला पाठिंबा नसला तरी इंधन असेपर्यंत सेवा देणार अशी भूमिका स्कूल बस असोसिशनने घेतली आहे. हिट अँड रन कायद्याविरोधातील आंदोलनाला पाठिंबा नाही किंवा त्यात सहभागी झालेलो नाहीत. स्कूल बसेसना जोपर्यंत डिझेल मिळेल तोपर्यंत बस रस्त्यावर धावतील आणि सेवा देतील, अशी माहिती महाराष्ट्र स्कूल बस असोसिएशन अध्यक्ष अनिल गर्ग यांनी दिली आहे. मुंबईत एकूण सहा हजार ते महाराष्ट्रात 40 हजार स्कूल बसेस आहेत. 


भाज्यांची आवाक घटली 


वाहतूकदारांच्या संपाचा परिणाम बाजार समितीवर झाला आहे. भाजी मार्केटमध्ये गाड्यांची आवक घटली आहे. महाराष्ट्रात 400 ते 425 गाड्यांची आवक होते, मात्र संपामुळे दोन दिवस 100 ते 150 गाड्यांची आवक कमी झाली आहे.. भाजीपाला दरात 20 ते 25 टक्के वाढ झाली आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Petrol-Diesel Price: मालवाहतूकदारांचा संप मागे, पण इंधन पुरवठा सुरळीत होण्यास काही ठिकाणी विलंब; आज पेट्रोल-डिझेलचे दर काय?