मुंबई : कायमच कुठल्यानं कुठल्या कारणांमुळे चर्चेत राहणारा आदिवासी विकास विभाग (Tribal Development Department) अधिकाऱ्यांच्या बर्थ डे सेलिब्रेशनमुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आदिवासी विकास विभागाचे उप आयुक्त सुदर्शन नगरे (Sudarshan Nagare) यांचा वाढदिवस बुधवारी धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. साहेबांची केबिन, टेबल सर्वकाही फुलांनी सजविण्यात आले होते. एवढंच नाही तर आनंदाच्या भरात साहेबांची खातिरदारी करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी कार्यालयातच कोल्ड फायर लावून साहेबांच्या वाढदिवसाला चार चांद लावून टाकले.


बॉस लिहिलेला केक आणि जोरदार सेलिब्रेशन


एखाद्या सेलिब्रिटीच्या स्टेज शो सारखा माहोल आदिवासी विकास विभागाच्या कार्यालयात बघायला मिळत होता. पार्टी बोअम्बरने साहेबांचे अभूतपूर्व स्वागत करण्यात आले आणि सहकाऱ्यांच्या उपस्थितीत Boss नाव लिहिलेल्या केकचे कटिंगही करण्यात आले. कल्पनेपेक्षाही जोरदार वाढदिवस साजरा झाल्यानं साहेबही भारावून गेले आणि तेवढ्यात अतिउत्साही कर्मचाऱ्यांकडून या साजरा केलेल्या वाढदिवसाचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. 


यांसंदर्भात एबीपी माझाने आदिवासी आयुक्त नयना गुंडे यांच्यांशी संपर्क साधला असता या सेलिब्रेशन बाबत त्यांना माहिती नव्हती. तर स्वतः उप आयुक्त सुदर्शन नगरे यांनीदेखील एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढदिवस साजरा होईल याची कल्पना नसल्याची माहिती एबीपी माझाला दिली. भविष्यात सरकारी कार्यालयात या पद्धतीने कोणाचाच वाढदिवस साजरा होणार नाही याची काळजी घेण्याचे आश्वासन दिले. 


बाहेर आंदोलन, आत वाढदिवस साजरा


आदिवासी विभागामध्ये धुमधडाक्य़ाने साजरा करण्यात आलेल्या या वाढदिवसाची चर्चा मात्र सर्वत्र जोरदार सुरू आहे. ज्या वेळी कार्यालयात हा वाढदिवस साजरा होत होता त्याचवेळी कार्यालयाबाहेर आदिवासींच्या एका प्रश्नावरून आंदोलन सुरू होतं. त्याकडे मात्र अधिकाऱ्यांचं लक्ष गेलं नसल्याचं सांगितलं जातंय. 


नाशिकमध्ये आदिवासी विभागाचे मुख्यालय असून आदिवासींच्या समोरील असलेले प्रश्न सोडवण्यासाठी रोज हजारो नागरिक त्या ठिकाणी चकरा मारतात. अशावेळी त्यांच्याकडे दुर्लक्ष करून अधिकाऱ्यांचे अशा प्रकारचे जंगी वाढदिवस साजरे करणे कितपत योग्य आहे असा प्रश्न विचारला जात आहे. 


वाढदिवस साजरा करण्यासाठी आणि वरिष्ठांना शुभेच्छा देण्यासाठी काहीच हरकत नाही. मात्र आपण कोणत्या जागेत आणि कशा प्रकारे वाढदिवस साजरा करतो, याचे भान कमीतकमी कर्मचाऱ्यांनी बाळगायला पाहिजे होते. निदान यापुढे तरी असे प्रकार घडणार नाही याची खबरदारी घेण्याची गरज आहे. 


ही बातमी वाचा: