लोणावळा : लोणावळ्याजवळच्या विसापूर किल्ल्यावर अडकलेल्या पर्यटकाची पाच तासांनंतर सुटका करण्यात आली आहे. अमर कोरे असं सुटका केलेल्या तरुण पर्यटकाचं नाव आहे. मार्ग माहित नसतानाही 8 ते 10 तरुणांनी भाजे लेण्याच्या बाजूने विसापूर किल्ल्याची चढाई सुरु केली. पण बोलण्याच्या नादात ते भरकटले आणि थेट जंगलात घुसले. तीव्र चढावरच्या एका ठिकाणी अमर अडकला. पण तब्बल 5 तास अडकून पडल्यानंतर शेवटी शिवदुर्ग रेस्क्यू टीमच्या सहकाऱ्यांनी त्याला बाहेर काढलं.


VIDEO | पाच तासांच्या थरारानंतर विसापूर किल्ल्यावर अडकलेल्या हौशी पर्यटकाची सुटका | लोणावळा | ABP Majha



हौशी पर्यटकाच्या सुटकेटचा थरारक घटनाक्रम

अमर कोरेसह 8 ते 10 हौशी तरुणांनी भाजे लेणी कडून विसापूर किल्ल्याची चढाई सुरु केली. गप्पांच्या नादात किल्ला दिसतोय म्हणून तरुणांनी आगेकूच केली. पहिला टप्पा सर ही केला, पण बोलण्याच्या नादात ते भरकटले आणि थेट जंगलात घुसले. कसंबसं पुढं बाहेर पडले, वर पाहिल्यावर त्यांना किल्ल्याचा बुरुज दिसला. मागचा-पुढचा विचार न करता ते बुरुंजाच्या दिशेने मार्गस्थ झाले. पण ही तीव्र चढाई अमरला काही झेपली नाही. तो अशा ठिकाणी अडकला तिथून न वर चढू शकत होता, न खाली उतरू शकत होता. पाय घसरला तर तो थेट खोल दरीत पडण्याची भीती होती. अमरच्या मित्रांनी अर्धा तास त्याला वर घेण्याचे प्रयत्न केले. पण त्याला वर येता न आल्यानं तिकडेच अडकून पडला.

नंतर ग्रुपमधील कौशिक पाटील या मुलाने शिवदुर्ग रेस्क्यू टीमचा नंबर मिळवला आणि ही बाब कानावर टाकली. व्हाट्सऍपवर घटनास्थळ स्पष्ट होईल असे व्हिडीओ शिवदुर्ग ने मागवले. मग शिवदुर्गाच्या व्हाट्सऍप ग्रुपवर मेसेज टाकून बचावकार्याला टीम सज्ज करण्यात आली. घटनास्थळाच्या परिसरात टीम सदस्य सागर कुंभार तातडीनं मार्गस्थ झाला आणि अडकलेल्या अमरला पकडून ठेवलं. कौशिकच्या फोननंतर साधारण दीड तासात टीम घटनास्थळी पोहचली. बचावकार्य सुरु झालं, पण दमदार पावसाने हजेरी लावली. अशात कोणतीही तमा न बाळगता टीमधील विकास मावकरने खाली उतरायची तयारी दर्शवली. दोरी आणि हार्नेसच्या साह्याने विकास कसाबसा अमरजवळ पोहचला. अमरलाही हार्नेस देण्यात आलं. मग सागर आणि विकास त्याला दोरीच्या साह्याने वर घेऊन आले. अशा रीतीने या हौशी पर्यटकाची तब्बल पाच तासाने सुखरूप सुटका झाली. अमरने शिवदुर्ग टीमचे आभार मानले. त्यामुळे हौशी पर्यटकांनी यातून धडा घ्यावा आणि पर्यटनस्थळांची अपुरी माहिती घेऊन पर्यटन करण्याचं धाडस करु नये.