स्वत:च्याच शेतात महिलेचा अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळला
एबीपी माझा वेब टीम | 19 Jul 2019 08:39 AM (IST)
ही आत्महत्या ही हत्या यावरुनही संशय व्यक्त केला जात आहे. ज्याठिकाणी मृतदेह आढळला त्याच्या बाजूने बोराची काटे आहेत. त्यामुळे आधी हत्या करुन नंतर जाळण्यात आलं असल्याचाही संशय आहे.
सोलापूर : सोलापुरात बार्शी तालुक्यातील कुसळंब येथे एका महिलेचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. वनमाला शिंदे असं या शेतकरी महिलेचं नाव असून अर्धवट जळालेल्या अवस्थेत तिचा मृतदेह सापडला आहे. शेतातच त्यांचा मृतदेह आढळला. गुरुवारी (18 जुलै) पहाटे साडेपाचच्या सुमारास वनमाला यांचा मुलगा हर्षद आणि त्यांचा पती पोपट शिंदे हे शेतातील पिकाला पाणी देण्यासाठी शेतातील बोरीच्या बागेजवळ गेले. त्यावेळी त्याठिकाणी काहीतरी जळत असल्याचे दिसून आलं. त्यांनी जवळ जाऊन पाहिलं असता मृतदेह अर्धवट जळालेला दिसला. या मृतदेहाची पाहणी केली असता, हातामधील अर्धवट जळालेल्या बांगड्यांवरुन त्या वनमाला असल्याचं स्पष्ट झालं. मात्र ही आत्महत्या ही हत्या यावरुनही संशय व्यक्त केला जात आहे. ज्याठिकाणी मृतदेह आढळला त्याच्या बाजूने बोराची काटे आहेत. त्यामुळे आधी हत्या करुन नंतर जाळण्यात आलं असल्याचाही संशय आहे. दरम्यान बार्शी तालुका पोलिस ठाण्यात याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.