औरंगाबाद : एकीकडे काँग्रेसची वंचित आघाडीसोबत विधानसभा निवडणुकीत आघाडीची चर्चा सुरु असताना दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीने विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातल्या सर्व जागांकरता तयारी देखील सुरु केली आहे.


विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निवडणुकीची पुर्वतयारी सुरु झाली आहे. त्यानुसार इच्छुकांच्या मुलाखतींचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. 13 ते 16 जुलैपर्यंत विदर्भातील सर्व मतदारसंघासाठी इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या आहेत.


आता मराठवाड्यातील मतदारसंघासाठी मुलाखतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. वंचित बहुजन आघाडीतील बोर्ड सदस्य अॅड. अण्णाराव पाटील, अशोकभाऊ सोनोने आणि रेखाताई ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत घेतल्या जाणार आहे.


लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही चर्चेचं नाटक करुन वंचित आघाडी एकला चलोची भूमिका घेणार असल्याची चर्चा जोर धरु लागली आहे.


मराठवाड्यातील मुलाखतींचा कार्यक्रम


उस्मानाबाद - 21 जुलै
बीड - 22 जुलै
लातूर - 23 जुलै
नांदेड - 24 जुलै
हिंगोली - 25 जुलै
परभणी- 26 जुलै
औरंगाबाद - 27 जुलै
जालना - 28 जुलै