पंढरपूर : बापाने पेपर विकून आपल्या मुलाला इंजिनीअर केलं. मुलाने शिक्षणात आपली चमक दाखवली आणि त्याला बड्या कंपनीत नोकरीही मिळाली. कुटुंब आनंदात होतं आणि यातच मुलाला कोरोनाची लागण झाली. उपचार केले, मात्र कोरोनारुपी काळाने त्याला हिरावून नेलं. आयुष्यभर केलेले कष्ट, पाहिलेली स्वप्ने क्षणार्धात हातून निसटून गेली. ही हृदयद्रावक घटना आहे पंढरपुरातील उमदा अभियंता शुभम भोसलेची. 


शुभम पहिल्यापासून अतिशय हुशार म्हणून शाळेत नावाजला जायचा. घराची गरिबी असल्याने लहानपणापासून वडिलांना घरोघरी पेपर टाकण्यात मदत करायचा. वडील सोमनाथ भोसले हे पंढरपुरातील पेपर विक्रेते होते, त्यामुळे पहाटे चार वाजल्यापासून शुभमचा दिवस सुरु व्हायचा. वडिलांना मदत करत तो शिक्षण घेत होता. बारावीला चांगले मार्क मिळाल्याने त्याला कुठेही प्रवेश मिळू शकत असताना, घराच्या परिस्थितीची जाणीव ठेवत पंढरपूर इथल्या स्वेरी इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. कम्प्युटर इंजिनीअरिंगच्या पदवी चांगल्या गुणांनी मिळवली. या गुणांच्या जोरावर त्याला कोलकाता इथे टीसीएस या बड्या कंपनीत चांगल्या पगाराची नोकरीही मिळाली. 


आता भोसले कुटुंबाचे चांगले दिवस येण्याची वेळ आली होती. कोरोनाच्या संकटामध्ये शुभम घरातूनच अखंड कंपनीचे काम करत होता. काही दिवसापूर्वी त्याचा विवाह निश्चित होऊन साखरपुडाही झाला. आता सगळे चांगले घडणार या स्वप्नात सोमनाथ भोसले आणि त्याचे कुटुंब असतानाच, चार-पाच दिवसांपूर्वी शुभमला कोरोनाची लक्षणे जाणवू लागली. पहिल्यांदा पंढरपूर इथेच उपचार केले, मात्र त्रास वाढू लागल्याने त्याला सोलापुरातील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी हलवले. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले मात्र कोरोनारुपी काळाने काल (28 एप्रिल) पहाटे त्याला सगळ्यातून हिरावून नेले. 


आपल्या भावी आयुष्याची स्वप्ने रंगवणारा अवघ्या 24 वर्षाचा शुभम अर्ध्यावरच वाट सोडून निघून गेला. ज्या मुलाच्या भविष्यासाठी वडील सोमनाथ भोसले यांनी जीवापाड कष्ट केले, त्यांना चांगले दिवस दिसू लागताच काळाने हा घाला घातला. शुभमच्या मृत्यूने भोसले कुटुंबावर आभाळच कोसळलं आहे.