जळगाव : जळगाव जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात सध्या एका कथित ऑडिओ क्लिपनं खळबळ उडाली आहे. या क्लिपमध्ये माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी भाजप आमदार गिरीश महाजन यांच्याविषयी आक्षेपार्ह उल्लेख केला असल्याचं बोललं जात आहे. या ऑडिओ क्लिपवरुन गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसेंवर गंभीर टीका केली आहे. एकनाथ खडसेंचं मानसिक संतुलन बिघडलंय असं मला वाटतंय. त्यांनी बोलत राहावं. माझा त्यांच्यावर रोष नाही, असं गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे. 
 
गिरीश महाजन म्हणाले की, खडसे यांनी अतिशय अश्लील भाषेत प्रतिक्रिया दिली आहे. पण त्यात खडसे साहेबांचा दोष नाहीये. मी त्यासाठी एकनाथ खडसेंना दोष देणार नाही. कारण वाढतं वय, इतके आजार आणि त्यात जो माणूस मुख्यमंत्रीपदाची अपेक्षा करत होता, त्याला आज आमदारकीही मिळत नाहीये. त्यामुळे त्यांचं मानसिक संतुलन बिघडल्यासारखं झालंय असं मला वाटतंय. त्यामुळे मला त्यांच्याबद्दल कोणताही रोष नाही. त्यांनी बोलत राहावं. लोकांना कोण काय आहे हे सगळं माहिती आहे. पण खूप वेगळ्या मनस्थितीत ते सध्या आहेत. राष्ट्रवादीमध्ये जाऊन त्यांना आमदारकी मिळालेली नाही. लोकांनी त्यांच्या मुलीला मतदारसंघात नाकारलेलं आहे. त्यामुळे अशी अवस्था कुणाचीही होईल. त्या अवस्थेत ते बोलत आहेत, अशा शब्दात गिरीश महाजनांनी टीका केली आहे. 


माझी तब्येत एकदम ठणठणीत- खडसेंचं प्रत्युत्तर
गिरीश महाजन यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना खडसेंनी म्हटलं आहे की, माझी तब्येत एकदम ठणठणीत आहे. गिरीश भाऊ खात्री करायची असेल तर करू शकता. मुख्यमंत्र्याची स्वप्ने पाहणे काय गैर आहे.  गिरीश भाऊंना राजकारणात जन्माला मी आणले. त्यांच्या राजकारणात आर्थिक मदत मी दिली. त्यांच्या प्रचारासाठी गल्लोगल्ली मी फिरलो. म्हणून आज गिरीश भाऊ दिसत आहेत. मी कोणाची हांजी हांजी करत नाही, मी कोणाचे पाय चाटत नाही. त्यामुळे गिरीश भाऊ तुम्ही माझी काळजी करण्याची गरज नाही पहिले आपल्या मतदार संघात पहा, असं प्रत्युत्तर खडसेंनी दिलं आहे. 


काय आहे या कथित ऑडिओ क्लिपमध्ये?


ऑडिओ क्लिपमध्ये एका मुलाशी खडसेंसारखाच आवाज असलेल्या व्यक्तीचे संभाषण आहे. या क्लिपमध्ये  त्या मुलानं गावात पाणी नसून आमदार गिरीश महाजन माझा फोन उचलत नाहीत, अशी तक्रार केल्याचे ऐकायला मिळतंय. त्यावर खडसेंसारखा आवाज असणारा व्यक्ती म्हणतो की, तुमचा आमदार कुठं गेला.  बरोबर आहे, तो फक्त मुलींचेच फोन उचलतो, असा संवाद त्यात आहे.