Lonavala Covid News : लोणावळ्यात (lonavala) मास्क, सॅनिटाईज आणि सोशल डिस्टनसिंग राखण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. तसेच हॉटेल, लॉजिंग (pune) आणि रिसॉर्ट (corona) मालकांना या उपाययोजना राबवण्याचं आवाहन लोणावळा नगरपरिषद मुख्याधिकारी पंडित पाटील यांनी केलं आहे.
राज्यात सध्या कोरोनाचे रुग्ण वाढू नये, यासाठी अनेक स्तरावर खबरदारीच्या सूचना देण्यात येत आहे. त्यात ख्रिसमस आणि 31 डिसेंबर साजरा करण्यासाठी अनेक नागरिक आतुर आहेत. ख्रिसमस आणि 31 डिसेंबरसाठी पर्यटकांचं केंद्रस्थान असणाऱ्या लोणावळ्यादेखील कोरोना रोखण्यासाठी सुरुवातीपासून खबरदारी घेण्यात येत आहे.
लोणावळ्यामध्ये ख्रिसमस आणि 31 डिसेंबरसाठी मोठ्या प्रमाणात पर्ययटकांची ये-जा असते. त्या सर्व पर्यटकांनी शासनाने दिलेल्या आदेशाचं पालन करावं. लोणावळ्यात मोठ्या प्रमाणात लॉज, रिसॉर्ट आणि हॉटेल्स आहेत. अनेक पर्यटक याच ठिकाणी सेलिब्रेशनसाठी येत असतात. त्यामुळे नगर परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत या हॉटेल मालकांना पत्र देण्यात येणार आहे. त्या पत्रामार्फत त्यांना मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्सिंगचा वापर करण्याच्या सूचना देण्यात येतील. केंद्र शासनाच्या प्रत्येक सूचनांचं पालन या हॉटेल धारकांनी करणं गरजेचं असल्याचं मुख्याधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.
राज्यातील अनेक मंदिरांमध्ये मास्क वापरण्याचं आवाहन
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून सुरुवातीपासूनच काळजी घेण्यात येत आहे. राज्यातील प्रमुख मंदिरांमध्ये मास्कसक्ती करण्यात आली आहे. तुळजापूर भवानी मंदिर, दगडूशेठ मंदिर, नाशिकच्या अनेक प्रमुख मंदिरांमध्ये, शिर्डीच्या साई मंदिरांमध्ये मास्क सक्ती तर कुठे मास्क वापरण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. त्यामुळे कोरोना रोखण्यासाठी प्रशासनाचे युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु केल्याचं दिसत आहे.
विदेशी नागरिकांचं थर्मल स्क्रिनिंग होणार
चीन आणि देशाच्या काही भागांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे सगळीकडे खबरदारी घेतली जात आहे. याच सगळ्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी पुणे महापालिकादेखील सज्ज झाली आहे. खबरदारीचा भाग म्हणून पुणे विमानतळावर बाहेर देशातून येणाऱ्या प्रवाशांचे थर्मल स्क्रीनिंग सुरु करत आहे, असं PMC अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी सांगितले. खबरदारीच्या उपायांचा भाग म्हणून पीएमसीने लोकांना कोविडच्या नियमांचं पालन करण्याचे आवाहन केलं आहे. परिस्थिती नियंत्रणात असून नागरिकांनी घाबरुन जाऊ नये, असेही ते म्हणाले. पुण्यात सध्या 44 सक्रिय कोविड पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. चाचणीसाठी आरटीपीसीआर केंद्रे पुन्हा सुरु केली जातील आणि वॉर्ड कार्यालयांच्या माध्यमातून गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये जनजागृती मोहीम राबवण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.