Pune Covid Update : चीन आणि देशाच्या (covid) काही भागांमध्ये (pune) कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे सगळीकडे खबरदारी घेतली जात आहे. याच सगळ्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी पुणे महापालिकादेखील सज्ज झाली आहे. खबरदारीचा भाग म्हणून पुणे विमानतळावर बाहेर देशातून येणाऱ्या प्रवाशांचे थर्मल स्क्रीनिंग सुरु करत आहे, असं PMC अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी सांगितले.
खबरदारीच्या उपायांचा भाग म्हणून पीएमसीने लोकांना कोविडच्या नियमांचं पालन करण्याचे आवाहन केलं आहे. परिस्थिती नियंत्रणात असून नागरिकांनी घाबरुन जाऊ नये, असेही ते म्हणाले. पुण्यात सध्या 44 सक्रिय कोविड पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. चाचणीसाठी आरटीपीसीआर केंद्रे पुन्हा सुरु केली जातील आणि वॉर्ड कार्यालयांच्या माध्यमातून गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये जनजागृती मोहीम राबवण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
विमानतळ संचालक संतोष ढोके यांनीही महानगरपालिकेचे अधिकारी थर्मल स्क्रीनिंग करणार असल्याची माहिती दिली आहे. पुणे विमानतळावर दुबई, सिंगापूर आणि बँकॉकसाठी प्रत्येकी एकासह तीन आंतरराष्ट्रीय उड्डाणे आहेत. सिंगापूर आणि बँकॉकची उड्डाणे गेल्या महिन्यात जोडण्यात आली होती, तर दुबईची फ्लाईट बऱ्याच महिन्यांपासून सुरु आहे. आयटी हब असल्याने शहरात अनेक कंपन्या आहेत ज्यांचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन आहेत. याशिवाय अनेक परदेशी विद्यार्थीही पुण्यात शिक्षण घेतात. त्यामुळे खबरदारी घेण्याची गरज असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
आम्ही गुरुवारपासून विमानतळावर आमच्या अधिकार्यांची एक टीम तैनात केली आहे आणि आंतरराष्ट्रीय विमानाने येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला थर्मल स्क्रीनिंग करावी लागेल. शिवाय, प्रवाशांच्या आरटी पीसीआर चाचण्या करण्यासंदर्भात आम्ही केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करु, पीएमसीच्या आरोग्य विभागाचे प्रमुख डॉ आशिष भारती यांनी सांगितलं आहे.
बूस्टर डोस घेण्याचं आवाहन
पुण्यातच नाही तर देशभरातील अनेक नागरिकांनी अजूनही बूस्टर डोस घेतला नाही आहे. त्यामुळे नागरिकांना बूस्टर डोस घेण्याचं आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आलं आहे.
मार्गदर्शक सूचना
• सोशल डिस्टन्सिंगचं काही प्रमाणात पालन करावं.
• विमानतळावर आरोग्य अधिकार्यांनी सर्व प्रवाशांचे थर्मल स्क्रीनिंग केले पाहिजे.
• स्क्रीनिंग दरम्यान लक्षणे आढळलेल्या प्रवाशांचं ताबडतोब विलगीकरण करण्यात येणार आहे. आरोग्य प्रोटोकॉलनुसार नियुक्त वैद्यकीय सुविधेत नेले जाईल.
• सर्व प्रवाश्यांनी आगमनानंतर त्यांच्या आरोग्याचे स्व-निरीक्षण केले पाहिजे आणि त्यांच्या जवळच्या आरोग्य सुविधेला देखील कळवावे किंवा त्यांना कोणतीही सूचक लक्षणे आढळल्यास राष्ट्रीय हेल्पलाइन क्रमांक (1075)/राज्य हेल्पलाइन क्रमांकावर कॉल करावा.