दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...


1. महाराष्ट्रातला 22 हजार कोटींचा आणखी एक उद्योग गुजरातमध्ये, सी-295 लष्करी ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट बडोद्यात होणार, पंतप्रधान मोदींच्या हस्ते 30 ऑक्टोबरला कोनशिलेचं उद्घाटन


वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पानंतर नागपूरमध्ये होणारा 22 हजार कोटींचा टाटा एअरबस प्रकल्प गुजरातला गेला. एकामागून एक मोठे प्रकल्प गुजरातला जात आहेत. त्यामुळे महाराष्ट्र सरकारवर टीका होत आहे.


2. एअरबस प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्याने मविआ आक्रमक, प्रकल्प गुजरातला जात आहेत मात्र मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री बघ्याच्या भूमिकेत, जयंत पाटीलांचा निशाणा; उद्योगमंत्री सामंत यांच्या राजीनाम्याची मागणी तर भाजपचं मविआ सरकारकडे बोट


वेदांता फॉक्सकॉन (Vedanta-Foxconn) प्रकल्पापाठोपाठ आता नागपुरात येणारा टाटा एअरबस प्रकल्प (Tata Airbus) देखील महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेला आहे. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. आमचा महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवणार? अशी विचारणा त्यांनी सत्ताधाऱ्यांना केली आहे. प्रकल्प गुजरातला जात आहेत मात्र मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री बघ्याच्या भूमिकेत आहेत, अशी टीका जयंत पाटील यांनी केली.


3. शिंदे गटाच्या सदस्य नोंदणीला ठाकरे गटाकडून विरोध, एकनाथ शिंदेंच्या आवाजात नोंदणीसाठी फोन येत असल्याचा आरोप, फोन आल्यावर कुठलंही बटन दाबू नका... ठाकरे गटाचं आवाहन


4. मंत्री असताना त्यांनी महाराष्ट्र कधी पाहिलाच नाही, सुजय विखेंचा ठाकरेंवर निशाणा


ज्या महाराष्ट्राचे आपण मुख्यमंत्री होतो तो महाराष्ट्र दिसतो कसा हे पाहण्यासाठी ठाकरे सध्या राज्याचा दौरा करत आहे. पद गेल्यानंतर महाराष्ट्राची स्थिती पाहायला त्यांना वेळ मिळाला आहे. मात्र, मंत्री असताना त्यांनी महाराष्ट्र कधी पाहिलाच नाही अशी टीका भाजप खासदार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe-Patil) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्यावर केली. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरेंना निवांत वेळ दिला असल्याचेही विखे पाटील यावेळी म्हणाले.


5. सर्वसामान्यांना महागाईची झळ! भाज्यांचे दर आवाक्याबाहेर, किंमतीत 20 ते 25 टक्क्यांनी वाढ


महागाई (Inflation) दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. सणासुदीच्या काळात दूध, तेल यांसारख्या वस्तूंचे दर वाढलेले पाहायला मिळत असताना आता भाज्याचे दरही गगनाला भिडले आहेत. भाज्यांचे दर आवाक्याबाहेर पोहोचले आहेत. भाजीपाल्यांच्या किंमतीत 20 ते 25 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्याच्या खिशाला आणखी झळ बसणार आहे. भाजीपाल्याच्या दरात 20 ते 25 टक्क्यांनी वाढ झाल्याने गृहिणींचं बजेट आणखी कोलमडणार आहे.


6. महागाई दर नियंत्रणात येत नसल्याने RBI वर दबाब, बोलावली महत्त्वाची बैठक,  जागतिक बाजारात रुपयाची घसरण सुरुच


देशातील महागाईचा दर (Inflation Rate) दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. जागतिक बाजारात रुपयाची घसरण सुरुच आहे. महागाई दर नियंत्रणात येत नसल्याने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियावरील (RBI) दबाव वाढला आहे. या पार्श्वभूमीवर आरबीआयच्या पतधोरण समितीची अतिरिक्त बैठक बोलावण्यात आली आहे. महागाई दर नियंत्रणात ठेवण्यास आरबीआय अपयशी ठरली आहे. याचसंदर्भात सरकारला उत्तर देण्यासाठी समितीची बैठक 3 नोव्हेंबर रोजी बोलावण्यात आली आहे. 


7. कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांचा अजब प्रश्न, बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना विचारलं दारु पिता का?, काँग्रेसकडून व्हिडीओ ट्विट, तर आदित्य ठाकरेंकडून राजीनाम्याची मागणी


8. पंतप्रधान मोदी खरे देशभक्त, रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांची स्तुतीसुमनं, कुठल्याही देशाच्या दबावापुढे भारत झुकला नसल्याचंही वक्तव्य


9. मेटा कंपनीचे मालक मार्क झुकरबर्गला मोठा आर्थिक फटका, वर्षभरात 100 अब्ज डॉलरचं नुकसान


मेटा (Meta) कंपनीचे मालक आणि फेसबुकचे (Facebook) संस्थापक मार्क झुकरबर्गला (Mark Zuckerberg) मोठा आर्थिक फटका बसला आहे. 13 महिन्यांमध्ये मार्क झुकरबर्गला 100 अब्ज डॉलरचं नुकसान झालं आहे. मेटा प्लॅटफॉर्मच्या कमाईत सातत्याने घट होताना पाहायला मिळत आहे. गेल्या तिमाहीमध्ये मेटा प्लॅटफॉर्मच्या कमाईमध्ये 11 अब्ज डॉलरची घट झाली आहे. गेल्या वर्षभराच्या कालावधीपासून मार्क झुकरबर्गला मोठा आर्थिक फटका बसल्याचं दिसत आहे. यामुळे झुकरबर्गला संपत्तीत मोठं नुकसान झाल्याचं दिसत आहे. जगातील अनेक श्रीमंत व्यक्तींना यंदा मोठा आर्थिक फटका बसला आहे. या यादीत मेटा कंपनीचे मालक मार्क झुकरबर्गचं नाव आघाडीवर आहे.


10. इटलीत मिलानच्या शॉपिंग सेंटरमध्ये आर्सेनलचा फुटबॉलपटू पाब्लो मारीसह पाच जणांवर चाकू हल्ला, एकाचा मृत्यू, चार जखमी


मिलानमधील एका शॉपिंग सेंटरमध्ये आर्सेनलचा फुटबॉलपटू पाब्लो मारीसह (Pablo Mari) पाच जणांवर चाकूने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला. तर चार जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना गुरुवारी सायंकाळी घडली. स्थानिक मीडियाने दिलेल्या वृत्तानुसार, गुरुवारी संध्याकाळी 5.30 वाजता मिलानोफिओरी दि असागो शॉपिंग सेंटरमध्ये एकच गोंधळ उडाला असून चेंगराचेंगरी झाल्याचे समजते.