औरंगाबाद: फॉक्सकॉननंतर महाराष्ट्रातून आणखी एक महत्वाचा प्रकल्प गुजरातला गेलाय. 22 हजार कोटी रूपयांचा सी-295 लष्करी ट्रान्सपोर्ट एअरक्राप्ट प्रकल्प (C 295 transport aircraft) बडोद्यात होणार असून 30 ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कोनशिलेचं उद्घाटन होणार आहे. त्यामुळे यावरून आता शिंदे-फडणवीस सरकारवर पुन्हा एकदा टीका होऊ लागली आहे. दरम्यान विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी देखील राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. ईडी सरकार महाराष्ट्राचे आहे की गुजरातचे? असा खोचक टोला दानवे यांनी लगावला आहे. 


याबाबत ट्विट करतांना दानवे म्हणाले की, हे ईडी सरकार महाराष्ट्राचे आहे की गुजरातचे?... फॉक्सकॉन मविआमुळे गेले अशी ओरड केलीत, आता टाटा-एअरबस कोणामुळे गेला? या सरकारने 'जय महाराष्ट्र' म्हणणे बंद करावे! मिंधे-फसणवीस सरकारने आता 'जय जय गरवी गुजरात' हा नारा बुलंद केला पाहिजे. केंद्राच्या हुकूमशाहचा आवडता सुभा असलेल्या गुजरात राज्याची विधानसभा निवडणूक भाजपच्या पारड्यात आणण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकार जोरात काम करत आहे. प्रकल्प घालवण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करणारे हे सरकार महाराष्ट्राचे कैवारी की द्रोही? आता जनतेनेच सांगावे,असं दानवे म्हणाले.






शिंदे-फडणवीस सरकारची अकार्यक्षमता पाहायला मिळतेय...


याबाबत एबीपी माझाच्या प्रतिक्रिया देतांना अंबादास दानवे म्हणाले की, महाराष्ट्रातून टाटा-एअरबस सारखा प्रकल्प जाणे दुर्दैवी आहे. यामुळे शिंदे-फडणवीस सरकारची अकार्यक्षमता पाहायला मिळत असून, दिल्ली समोर झुकत असल्याचे समोर येत आहे. आत्ताच्या महाराष्ट्रातील सरकारमध्ये कोणतेही ताकद नाही, शक्ती नाही. दिल्ली जसे म्हणेल त्याप्रमाणे यांना वागावे लागत आहे. दिल्लीवाल्यांनी हा प्रकल्प गुजरातला पळवून नेला आणि महाराष्ट्र सरकार फक्त घोषणाबाजी करत असल्याचा आरोप दानवे यांनी केला.


उद्योग आणण्याबाबत उद्योगमंत्री सकारात्मक नाहीच...


राज्याचे उद्योगमंत्री उदय सावंत हे राज्यात उद्योग आणण्याबाबत बिलकुल सकारात्मक नसून, उलट उद्योगासाठी जे प्लँट जाहीर झाले ते थांबवण्यात त्यांना जास्त रस असल्याचं दानवे म्हणाले. याबाबत आम्ही आवाज उठू,जनतेमध्ये जाऊन जनजागृती करण्याचा प्रयत्न करू. मात्र शिंदे-फडणवीस सरकार जोपर्यंत राज्यात असेल तोपर्यंत असेच सुरू राहणार असल्याचा आरोप देखील दानवे यांनी केला.