दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो.
1. 16 बंडखोरांना अपात्र ठरवण्याबाबतच्या नोटिसीला सुप्रीम कोर्टात आव्हान, साळवे-जेठमलानी शिंदे गटाची, तर सिंघवी-सिब्बल ठाकरे सरकारची बाजू मांडणार, उपाध्यक्षांच्या वतीनं जंध्याल युक्तीवाद करणार
महाराष्ट्रातल्या सत्ताकारणाचा खेळ अखेर अपेक्षेप्रमाणे सर्वोच्च न्यायालयात पोहचला आहे. एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर आता अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. शिवसेनेकडून होत असलेल्या अपात्रतेच्या कारवाई विरोधात शिंदे गट सर्वोच्च न्यायालयात गेला आहे. बंडखोर आमदारांवर होत असलेल्या अपात्रतेच्या कारवाईला स्थगिती देण्याची मागणी शिंदे गटाकडून करण्यात आली आहे. तसेच अजय चौधरींच्या गटनेते पदाला शिंदे गटाचा आक्षेप असल्याची याचिका देखील दाखल करण्यात आली आहे. शिंदे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात दोन वेगवेगळ्या याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. यावर आज सुनावणी होणार आहे. न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जे.बी. पारडीवाला यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे. हरिश साळवे आणि महेश जेठमलानी एकनाथ शिंदे गटाची बाजू मांडणार आहेत. तर, कपिल सिब्बल आणि अभिषेक मनू सिंघवी उद्धव ठाकरेंची बाजू मांडतील. ॲडव्होकेट रवीशंकर जंध्याल उपाध्यक्षांची बाजू मांडणार आहेत. राजकीय वर्तुळांचे लक्ष याकडे लागले आहे.
सुनील प्रभूंच्या नियुक्तीविरोधात याचिका
दरम्यान. एकनाथ शिंदे गटाकडून दाखल करण्यात आलेल्या याचिकेत सुनील प्रभूंच्या नियुक्तीविरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे. याचिकेमार्फत शिंदे गटाने विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ शिवसेनेच्या बाजूनं कौल दिल्यानं थेट आव्हान दिले आहे. एकनाथ शिंदे,भरत गोगावले या दोघांकडून दोन याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. विधानसभा उपाध्यक्षांनी अपात्रतेसंदर्भात दिलेली नोटीस बेकायदेशीर आहे. गटनेते, प्रतोद नियुक्त्या अवैध पद्धतीने केल्याचा दावा या याचिकेत करण्यात आला आहे. तसेच शिंदे गटाकडून उपाध्यक्षांकडून आलेला अविश्वासाचा प्रस्ताव फेटाळल्याचे देखील म्हटले आहे.
2. विधानसभा उपाध्यक्षांच्या नोटिशीला उत्तर देण्यासाठी संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंतची वेळ, 16 बंडखोरांबाबतच्या निर्णयावर शिंदे गटाच्या बंडाचं भवितव्य अवलंबून
3. विलिनीकरणाची वेळ आल्यास शिंदे गट मनसेत विलीन होणार का? राजकीय गोटात चर्चांना उधाण, तर कोणत्याही पक्षात विलीन होणार नसल्याचं शिंदे गटाकडून स्पष्ट
4. गुवाहाटीतून आत्मा मेलेले 40 मृतदेह येतील, बंडखोरांबाबत संजय राऊतांचं वादग्रस्त वक्तव्य, तर शिवसेना वाचवण्यासाठी मरण आलं तरी बेहत्तर, शिंदे गटाचा पलटवार
5. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे समर्थक आक्रमक, अनेक ठिकाणी पुतळ्यांची जाळपोळ, पोलिस यंत्रणेवर ताण, केंद्रीय सुरक्षा दलांना तैनात राहण्यासाठी राज्यपालांचं पत्र
पाहा व्हिडीओ : स्मार्ट बुलेटिन : 27 जून 2022 : सोमवार : एबीपी माझा
6.राष्ट्रपती राजवट लावल्यास बंडाचा काय फायदा?, पवारांचा शिंदे गटासह भाजपला सवाल, बहुमत सिद्ध करण्यासाठी अधिवेशन बोलवा, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पटोलेंची मागणी
7. शिवसेनेचे ९ मंत्री एकनाथ शिंदेंसोबत, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंतही शिंदे गटात, तर विधानसभेत निवडून आलेले एकमेव आदित्य ठाकरे शिवसेनेत
8. शिंदे गटातील आमदारांना सुरक्षा देण्यावरुन केंद्र विरुद्ध राज्य, केंद्राकडून विशेष सुरक्षा तर, राज्यापालांचं मुंबई पोलीस आयुक्त आणि डीजीपींना पत्र, राज्य गृहविभागाचं स्पष्टीकरण
9. राज्यात जुलैमध्येही पावसाच्या लपंडावाची शक्यता, किनारपट्टीवरील कमी दाबाचा पट्टा क्षीण झाल्याचा फटका तर ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज
10. भारताचा आयर्लंडवर 7 विकेट्सने दमदार विजय, मालिकेत 1-0 ची आघाडी, दीपक हुडाची तुफानी फलंदाजी