Shahaji Patil Viral Video : "आम्ही सध्या गुवाहाटी आहे. काय झाडी, काय डोंगार, काय हाटील...येकदम ओक्केमध्ये आहे" सांगोल्याचे शिवसेनेचे आमदार शहाजी बापू पाटील यांच्या या डायलॉगने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. सध्या अनेक मीम्स या डायलॉगवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यातच आता शहाजी पाटील यांचा सहा महिन्यांपूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेतील संवाद व्हायरल होत आहे. माझ्यावर कोणताही अन्याय झालेला नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन वर्षात आपल्याला 240 कोटींचा विकासनिधी दिल्याचं ते सांगत आहेत. तसंच मी जिवंत असेपर्यंत माझे नेते उद्धवजी ठाकरेच राहतील, असंही म्हणताना दिसत आहेत. शहाजी पाटील यांचा हा संवाद 10 जानेवारी 2022 रोजीचा सांगोल्यातील आहे.


यापूर्वी आमदार शाहजी पाटील यांचे जे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झालं आहे त्यात पुरेसा विकासनिधी मिळत नसल्याने नाराज आहेत, अशी खंत ते व्यक्त करत आहेत. येणाऱ्या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे होतील मग आपल्या मतदारसंघात ऐतिहासिक कामं करु असं बोलतात. नुकत्याच व्हायरल झालेल्या पत्रकार परिषदेतील संवादात विकासनिधीबाबत माझ्यावर कोणताही अन्याय झाला नाही, असं शहाजी पाटील यांनी म्हटलं होतं.  मात्र यापूर्वीच्या व्हायरल कॉल रेकॉर्डिंगमध्ये माझं घरदार बरबाद झालं. पाटलाची सून असून माझ्या बायकोला लुगडं मिळालं नाही, अशी खंत आमदार शाहाजी पाटील यांनी व्यक्त केली होती. 


सहा महिन्यांपूर्वी पत्रकार परिषदेत शहाजी पाटील काय म्हणाले होते? 
मात्र सहाच महिन्यांपूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्याला दोन वर्षात 240 कोटी रुपयांचा विकासनिधी दिला आहे. मी आता 1047 कोटींचा निधी मागितला असून मंत्रीमहोदयांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून हे आर्थिक वर्ष संपताना या तालुक्यातील विकासनिधीचा आकडा दीड हजार कोटी रुपयांच्या पुढे जाईल, अशी माहिती आमदार शाहजी बापू पाटील यांनी दिली होती. शिवसेना हा पक्ष आणि मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याबाबत मी कडवा आहे आणि कडवाच राहणार आहे.  शिवाय मी जिवंत असेपर्यंत माझे नेते उद्धव जी ठाकरेच राहतील. हा पक्ष मी राजकीय गणिताने स्वीकारलेला नसून हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची विचारधारा आणि उद्धव ठाकरे यांचं नेतृत्त्व या भावनेने स्वीकारला आहे. माझ्या मृत्यूपर्यंत हीच भावना राहणार आहे. माझे नेते उद्धवजी ठाकरेच आहेत आणि मी जिवंत असेपर्यंत माझे नेते उद्धवजी ठाकरेच राहतील हे मी नम्रतापूर्वक सांगतो.


शिवसेनेत बंडाळी, आमदार गुवाहाटीत
महाराष्ट्राच्या राजकारणात एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर आता अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. आज या सत्तासंघर्षाचा सातवा दिवस आहे. सध्या राज्यातील सत्तासंघर्षाचं केंद्र गुवाहाटी बनलं आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोर आमदार गुवाहाटीमधील हॉटेल रॅडिसन ब्लूमध्ये मुक्कामाला आहेत.  शिवसेनेत उभी फूट पडली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बाजूने असलेले आमदार एक एक करुन शिंदे गटात सामील होत आहेत. आता विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी 16 बंडखोर आमदारांना नोटीस बजावली आहे. त्यामुळे हा संघर्ष आता कोर्टात पोहोचला आहे.



संबंधित बातम्या