Maharashtra political crisis: राज्यात सत्तेत असलेल्या शिवसेना पक्षात बंडाचं वादळ आले आहे. मात्र शिवसेनेत निवडून येणाऱ्या लोकांनी बंड केल्यास त्यांना रस्त्यावर ठोकून काढा असा इशारा कधीकाळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिला होता. त्यामुळे आमदार-खासदार सोडा सादा नगरसेवक सुद्धा बंड करण्याची हिम्मत करत नव्हता. मात्र आज औरंगाबादसारख्या शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात एकाचवेळी पाच आमदारांनी बंड केले आहे. त्यामुळे असे असताना शिवसेनेच्या स्थानिक पातळीवर शांतता असल्याने खैरे यांनी नाराजी व्यक्त केली. तर 'आता काय मी जाऊन त्यांचे कार्यालये फोडू' असे म्हणत त्यांनी पदाधिकाऱ्यांचे कान टोचले. 


काय म्हणाले खैरे...


खैरे यांनी औरंगाबादमध्ये रविवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी खैरे यांना पत्रकारांनी प्रश्न केला की, याआधी सामान्य नगरसेवक फुटला तरी त्याच्या घरांवर हल्ले व्हायचे, यावेळी संघटना इतकी शांत कशी आहे. त्यावर खैरे संतापून म्हणाले, संघटना कशासाठी आहे? पदाधिकारी काय करीत आहेत. 'आता काय मी जाऊन त्यांचे कार्यालये फोडू' असे म्हणत त्यांनी आजूबाजूला बसलेल्या सेनेच्या स्थानिक नेत्यांचे आणि पदाधिकाऱ्यांचे कान टोचले.


अंबादास दानवे म्हणाले आम्ही अजूनही...


खैरे यांनी केलेल्या वक्तव्यानंतर शिवसेना आमदार तथा जिल्हाप्रमुख अंबादास दानवे म्हणाले की, शिवसेना आक्रमक नाही असे कोण म्हंटले, शिवसेनेने बंडखोर आमदारांच्या विरोधात केलेलं आंदोलन महाराष्ट्रात सर्वात पहिले औरंगाबादमध्ये झाले. पण तेही लोकं आमच्याच जवळचे आहेत. त्यामुळे आम्ही एक संधी दिली आहे.पण पक्षप्रमुख यांनी जर कारवाई करण्याचा निर्णय घेतल्यास या आमदारांचा आणि आमचा काहीही संबध राहणार नाही. त्यामुळे आगामी काळात मोठ्या आक्रमकपणे त्यांच्याविरुद्ध आघाडी करू असेही दानवे म्हणाले. 


शिरसाट यांच्या फोटोला काळे फासले


शिवसेनेचे बंडखोर आमदारांविरोधात शिवसैनिकांचा संताप अजूनही पाहायला मिळतोय. राज्यात अनेक ठिकाणी बंडखोर आमदारांच्या कार्यालयावर हल्ले होत आहे. त्यातच औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट यांच्या फोटोला शिवसैनिकांनी आज काळे फासले. पडेगाव येथे मुख्य रस्त्यावर लावण्यात आलेल्या होर्डिंगवरील शिरसाट आणि त्यांच्या मुलाच्या फोटोला काळे फासण्यात आले. तर याचवेळी होर्डिंग सुद्धा पाडण्यात आला. त्यांनतर स्थानिक शिवसैनिकांनी शिरसाट यांचे ते होर्डिंग काढून घेतले.