दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रीडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेण्यात येतो.
1. घटनापीठासमोर होणाऱ्या महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या सुनावणीवर अनिश्चिततेचं सावट, ठाकरे आणि शिंदे गटातील वादावरच्या अनेक घटनात्मक प्रश्नांच्या उत्तरांची प्रतीक्षा
2. घोषणाबाजी आणि अभूतपूर्व गोंधळामुळे गाजलेल्या अधिवेशनाचा आज अखेरचा दिवस, अंतिम आठवडा प्रस्तावावर मुख्यमंत्री काय बोलणार याकडे लक्ष
Maharashtra Monsoon Assembly Session : राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन (Maharashtra Monsoon Session) शेवटाकडे येताना जोरदार तापलं आहे. आज अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. काल विधिमंडळाच्या पायऱ्यांवर झालेल्या जोरदार राड्यानंतर वातावरण अजूनच जास्त तापलेलं आहे. विधिमंडळाच्या पायऱ्यांवर काल अभूतपूर्व असा गोंधळ घडला. महाराष्ट्रात एकीकडे शेतकरी अडचणीत आहे. अनेक प्रश्न आ वासून राज्यासमोर उभे आहेत. असं असताना लोकप्रतिनिधी म्हणून सभागृहात पाठवलेल्या या प्रतिनिधींकडून अशी कृती निश्चितच लाजिरवाणे असल्याची चर्चा समाजमाध्यमांमध्ये होती. आज अधिवेशनाची सांगता होणार आहे. आज अधिवेशनात राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत, रस्त्यांची दुरावस्था, राज्यातील कायदा सुव्यवस्था यासह अन्य मुद्द्यांवरुन विरोधक सरकारला कोंडीत पकडू शकतात
3. वर्षभरात 75 हजार शासकीय रिक्त जागा भरणार, शंभूराज देसाईंची विधान परिषदेत माहिती, मराठा समाजातील 1200 उमेदवारांना आरक्षित पदावर नियुक्त्या
राज्यात शासनाच्या 29 प्रमुख विभागांमध्ये दोन लाख 193 जागा रिक्त आहेत. यातील राज्य लोकसेवा आयोगाच्या कक्षेतील 100 टक्के पदभरती (Maharashtra Recruitment) करणार तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेतील पदे वगळता 50 टक्के पदे भरण्यात येणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानपरिषदेत दिली. शासनाच्या 29 प्रमुख विभागांमध्ये दोन लाख 193 जागा रिक्त असल्याबाबतची लक्षवेधी विधानपरिषदेत सादर करण्यात आली.
देशाच्या स्वातंत्र्यांच्या अमृतमहोत्सवी वर्षात 75 हजार पदांची भरती
मंत्री देसाई म्हणाले, देशाच्या स्वातंत्र्यांच्या अमृतमहोत्सवी वर्षात 75 हजार पदांची भरती करण्यात येणार आहे. मागील दोन वर्षात भरती प्रक्रिया काही प्रमाणात मंदावली होती मात्र आता ज्या प्रशासकीय विभागांनी सुधारित आकृतीबंध अंतिमरित्या मंजूर केले आहेत, अशा सुधारित आकृतीबंधातील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेतील पदे वगळता अन्य पदे 50 टक्के भरण्यात येणार आहेत तर राज्य लोकसेवा आयोगाच्या कक्षेतील 100 टक्के पदभरती करणार आहोत, असं शंभूराज देसाई यांनी सांगितलं.
4. नोंदणीकृत स्कूल बसशिवाय विशिष्ट स्कूलबससाठीची सक्ती शाळांना महागात पडणार, अशा शाळांची शिक्षण विभागामार्फत चौकशी होणार, सरकारची माहिती
5. वन्यप्राण्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यास 20 लाख रुपये आर्थिक मदत देणार, सुधीर मुनगंटीवार यांचा मोठा निर्णय
6.मी हिंदवी रक्षक, मी महाराष्ट्र सेवक... सदस्य नोंदणीसाठी मनसेचं नवीन घोषवाक्य, आज राज ठाकरेंच्या उपस्थितीत पुण्यात सदस्य नोंदणीला सुरुवात
7. मध्य रेल्वेवरच्या 10 एसी लोकलच्या फेऱ्या रद्द, त्या बदल्यात बिगरएसी लोकलची सेवा पूर्ववत, प्रवाशांच्या आक्रमक पवित्र्यानंतर रेल्वे प्रशासनाचा निर्णय
8. टीईटी परीक्षेत शिक्षण अधिकाऱ्याची मुलगी अपात्र असताना पात्र केल्याचा आरोप, अधिकाऱ्याकडून आरोपाचं खंडन
9. दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग, मुख्यमंत्री केजरीवालांनी बोलावली आमदारांची बैठक, पुढच्या रणनितीवर होणार चर्चा
10. युक्रेनच्या स्वातंत्र्यदिनालाच रशियाचा रॉकेट हल्ला, रेल्वे स्थानकावर झालेल्या स्फोटात 22 जणांचा मृत्यू, अनेक जखमी