1. आमदार अपात्रता आणि अन्य याचिकांवरील आजच्या सुनावणीबाबत अनिश्चितता, सुनावणीची तारीख निश्चित करण्यासाठी शिवसेनेचे वकील आज कोर्टात विनंती करणार
Maharashtra Political Crisis : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह 16 बंडखोर आमदारांची आमदारकी जाणार की राहणार याचा फैसला आज होण्याची शक्यता आहे. या 16 बंडखोरांच्या (Shiv Sena Rebel MLA) आमदारकीवर गदा आली तरी शिंदे-फडणवीस सरकारला मात्र तितकासा धोका नसल्याचं चित्र आहे. दरम्यान आज महाराष्ट्रातील सत्तांतराबाबतच्या सुप्रीम कोर्टाच्या आजच्या सुनावणीबाबत अनिश्चितता असल्याचं बोललं जात आहे. सुनावणीची तारीख निश्चित करण्यासाठी शिवसेनेचे वकील आज कोर्टात विनंती करणार असल्याची माहिती आहे. या सुनावणीवर शिंदे सरकारचं भवितव्य अवलंबून असणार आहे. शिवसेनेतून बंड करणाऱ्या, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाला आव्हान देणाऱ्या 16 आमदारांना अपात्र करा असं पत्र शिवसेनेच्या वतीनं विधानसभा उपाध्यक्षांना देण्यात आलं होतं. त्यावर या आमदारांनी 48 तासांच्या आत उत्तर द्यावं अशी नोटीस उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी जारी केली होती. पण या नोटिशीला उत्तर न देता या आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आणि उपाध्यक्षांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आणला असल्याचं न्यायालयाला सांगितलं.
2. सुप्रीम कोर्टाच्या नोटिशीला नरहरी झिरवाळांचं उत्तर, बंडखोरांना म्हणणं मांडण्यासाठी दिलेले 48 तास योग्यच, तर नव्या विधानसभा अध्यक्षांना अपात्रतेचे अधिकार, विधिमंडळ सचिवांचं कोर्टात शपथपत्र
3. गोवा काँग्रसमध्ये मोठी फूट, मायकल लोबो यांना विरोधी पक्षनेते पदावरून हटवलं. मात्र दोन तृतियांश आमदार सोबत नसल्यानं नवा गट स्थापन करण्याच्या मनसुब्यांना सुरूंग
4. आजपासून पुढील 3-4 दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता, कोकणासह, सातारा पुणे, चंद्रपूर, गडचिरोलीला रेड अलर्ट, राज्यातील धरणं भरण्यासही सुरुवात
5. अमरनाथमधील ढगफुटीनंतर सुरक्षा दलांकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू, आत्तापर्यंत १६ भाविकांचे मृतदेह हाती, ४१ जण अजूनही बेपत्ता
6. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची महत्वपूर्ण घोषणा, नागपुरात धावणार ब्रॉडगेज मेट्रो! रेल्वे बोर्डाची मंजुरी
7. औरंगाबादच्या नामांतराचा निर्णय शेवटच्या क्षणी, त्यावर कोणतीही चर्चा नाही; शरद पवारांची नाराजी
8. श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष गोटाबाया राजपाक्षे यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलक आक्रमक, काल राष्ट्रपती भवनात घुसल्यानंतरही तीव्र आंदोलन सुरूच
9. रोमहर्षक सामन्यात नोवाक जोकोविच विजयी, ऑस्ट्रेलियाच्या निक किर्गिओसला हरवलं, सलग चौथ्यांदा पटकावलं विम्बल्डनचं जेतेपद
10. सूर्यकुमारची एकहाती झुंज व्यर्थ, भारताचा इंग्लंडकडून 17 धावांनी पराभव, मालिका मात्र 2-1नं खिशात