मुंबई: राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या सर्व घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामध्ये आज राजकीय, सामाजिक, आर्थिक घडामोडींपासून ते खेळ आणि मनोरंजनाच्या बाबतीत अपडेट्स देण्याचा प्रयत्न असतो. आपल्या प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत.


महाराष्ट्रातील सत्तांतराबाबतच्या सुप्रीम कोर्टाच्या आजच्या सुनावणीबाबत अनिश्चितता
महाराष्ट्र सरकारच्या दृष्टीने महत्त्वाची असलेली सुनावणी आज होणार की नाही याबद्दल अद्याप अनिश्चितता आहे. या सुनावणीवर शिंदे सरकारचं भवितव्य अवलंबून आहे. कामकाजात समाविष्ट नसेल तर वकील आज सकाळी न्यायालयासमोर हे मॅटर मेन्शन करतील. त्यानंतर सुनावणी कधी होणार हे स्पष्ट होईल. सकाळी मेन्शन केलेलं मॅटर त्याच दिवशी सुनावणीला येण्याची शक्यता खूप कमी असते. आमदारांच्या अपात्रतेबाबत आणि या प्रकरणातील इतर याचिकांची सुनावणी 11 तारखेला होणार असं सुप्रीम कोर्टानं जाहीर केलं होतं. 


सुप्रीम कोर्ट कुठली बाजू मानणार? उपाध्यक्षांची की सचिवांची?
सुप्रीम कोर्टाच्या नोटिशीला उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी उत्तर दिलं आहे. अपात्रतेच्या कारवाईबाबत उत्तरासाठी आमदारांना 48 तासांची मुदत देणं हे काही नियमबाह्य वर्तन नाही. ही मुदत प्रथम दर्शनी दिलेली होती त्यावर आमदारांनी कुठल्याही पद्धतीने संपर्क साधण्याचा प्रयत्न केला नाही. माझ्या नोटिशीला उत्तर देण्याऐवजी अवघ्या 24 तासात ते सुप्रीम कोर्टात पोहोचले याचं आश्चर्य वाटलं, असं उत्तर झिरवाळांनी दिलंय. दुसरीकडे महाराष्ट्र विधिमंडळ सचिव राजेंद्र भागवत यांनी सुप्रीम कोर्टात शपथपत्र दाखल केलंय. नव्या विधानसभा अध्यक्षांची निवड झालेली आहे, त्यामुळे आता अपात्रतेचे अधिकार त्यांच्याकडे आहेत. त्यामुळे, उपाध्यक्ष म्हणतात ती 48 तासांची मुदत नियमबाह्य आहे असं सचिवांनी या शपथपत्रात म्हटलं आहे.


गोव्यातल्या काँग्रेस आमदारांचं बंड फसलं?
गोव्यातील काँग्रेसचे आमदार प्रत्यक्ष पक्षातून न फुटता विधानसभेत स्वतःचा एक गट तयार करण्याच्या तयारीत आहेत. काँग्रेसच्या 11 आमदारांपैकी 5 जण काल मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना भेटले. मात्र, नवीन गट स्थापन करण्यासाठी त्यांच्याकडे दोन तृतियांश बहुमत असणं आवश्यक आहे. गोवा विधानसभेचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. त्या पार्श्वभूमीवर गोव्यातील राजकीय घडामोडींना वेग आलाय. भाजपचे केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव काल गोव्यात दाखल झाले आहेत. विधानसभेचं कामकाज सकाळी 11 वाजता सुरु होणार आहे. 


आज सुप्रीम कोर्ट विजय माल्याला शिक्षा सुनावणार
अवमानता प्रकरणी सुप्रीम कोर्ट आज विजय माल्याला शिक्षा सुनावणार आहे. गेले पाच वर्ष न्यायालयासमोर हजर न झाल्यानं त्याला या प्रकरणी दोषी ठरवण्यात आलं होतं. केंद्र सरकारनं विजय माल्याला या प्रकरणी जास्तीत जास्त शिक्षा द्यावी अशी मागणी केली आहे.


पुढचे 3-4 दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता
आज रायगड, रत्नागिरी, पालघर, सातारा, पुणे, चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबई, ठाण्यासह उर्वरीत कोकणात आणि विदर्भाच्या काही भागांत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.


गडचिरोली- गेले दोन दिवस जिल्ह्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यात आजपासून पुढचे दोन दिवस गडचिरोलीत रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. त्यामुळे तीन दिवस जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. तसेच, अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने बंद राहतील. शासकीय कार्यालये सुरु राहतील. 


पुणे- सतत पडणाऱ्या पावसामुळे खडकवासला धरण साखळीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. 


सातारा-  प्रशासनाकडून सातारा जिल्ह्यासाठी रेड अलर्ट आजसाठी जाहीर करण्यात आला आहे. कोयना, महाबळेश्वर,  नवजा आणि इतर भागातील पावसाची तीव्रता वाढली आहे.


सांगली- यंदा कृष्णा नदीच्या अगोदरच वारणा नदीने पात्र सोडलं आहे. कारण शिराळा तालुक्यात आणि खासकरुन चांदोली धरण क्षेत्रात मागील तीन दिवसापासून मुसळधार पाऊस झाला. यामुळे वारणा नदी परिसरातील भात शेती, ऊस शेती पाण्याखाली जाण्यास सुरुवात झाली आहे. दुसरीकडे कृष्णा नदी पात्र परिसरात अजून मोठा पाऊस झाला नसल्याने आणि कोयना धरणातून विसर्ग सुरू नसल्याने कृष्णा अजूनतरी नदी पात्रातूनच वाहतेय. 


नाशिक- दोन दिवसांच्या धुवांधार पावसाने धरणांच्या पाणी पातळीत जवळपास दुपटीने वाढ झाली आहे. नाशिककरांवरील संभाव्य पाणीकपातीचे संकट टळले आहे.


अमरनाथमध्ये रेस्क्यू सुरुच, 41 नागरिक अजूनही बेपत्ता
अमरनाथमधील ढगफुटीनंतर आतापर्यंत 16 नागरिकांचे मृतदेह सापडले आहेत. 41 नागरिक अजूनही बेपत्ता आहेत. 98 जण जखमी झालेत तर 9 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. रेस्क्यू ऑपरेशन अद्याप सुरु आहे. या रेस्क्यू ऑपरेशनची माहिती देण्यासाठी आज एअरफोर्सची श्रीनगर विमानतळावर पत्रकार परिषद होणार आहे.