मुंबई : ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी...  या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू.


राज्यातील सत्तासंघर्षावर आज सुनावणी 


राज्यातील सत्तासंघर्ष प्रकरणी सुनावणी घेण्यात येणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाची रचना जाहीर करण्यात आली आहे. न्या. धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायमूर्तींचे घटनापीठ महाराष्ट्राच्या प्रकरणाची सुनावणी करणार आहे. त्यामुळे उद्या, बुधवारी सकाळी साडे दहा वाजता या प्रकरणी सुनावणी घेण्यात येणार आहे. या प्रकरणी जवळपास 11 मुद्द्यांवर हे पाच न्यायाधीशांचे खंडपीठ निर्णय देणार आहे. आज निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीबाबत सुप्रीम कोर्टाची भूमिका ठरण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर हे घटनापीठ नियमित कधीपासून कामकाज करणार हे स्पष्ट होईल. 


1. न्या. धनंजय चंद्रचूड
2. न्या.एम आर शहा
3. न्या. कृष्ण मुरारी
4. न्या.हिमाकोहली
5. न्या. पी नरसिंहा


आज निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीबाबत सुप्रीम कोर्टाची भूमिका ठरण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर हे घटनापीठ नियमित कधीपासून कामकाज करणार हे स्पष्ट होईल. मुख्य न्यायमूर्ती उदय लळीत यांनी पाच सदस्य खंडपीठाचे गठन केले आहे. हे पाच सदस्यीय खंडपीठ उद्या सकाळी सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाच्या याचिकांवर सुनावणी करेल.


किरीट सोमय्या यांचा पुन्हा रत्नागिरी दौरा


भाजप नेते किरीट सोमय्या आज पुन्हा रत्नागिरी दौऱ्यावर जाणार आहेत. अनिल परब यांचे रिसॉर्ट पाडण्याच्या प्रक्रियेला गती देणं हे प्रमुख कारण यामागे आहे. दुपारी 12.30 वाजता जिल्हाधिकारी, दुपारी 1 वाजता पोलीस अधीक्षक, त्यानंतर जिपचे सीईओ यांची ते भेट घेणार आहेत. 


ख्वाजा युनूस प्रकरणाशी संबंधित एका याचिकेवर सुनावणी


ख्वाजा युनूस प्रकरणातील आरोपी असलेल्या चार पोलिसांना दिलासा मिळणार का हे आज स्पष्ट होईल. या पोलिसांची नावं मागे घेण्यासाठी सरकारी वकिलांनी कोर्टात अर्ज केला आहे. त्यावर आज मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी होत आहे. साल 2002 च्या घाटकोपर ब्लास्टमधील संशयित आरोपी ख्वाजा युनूसच्या कोठडीतील मृत्यूनंतर त्याची आई आसिया बेगमने न्यायालयात एक याचिका दाखल केली आहे.