मुंबई: राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या सर्व घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामध्ये आज राजकीय, सामाजिक, आर्थिक घडामोडींपासून ते खेळ आणि मनोरंजनाच्या बाबतीत अपडेट्स देण्याचा प्रयत्न असतो. आपल्या प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत.


मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. यावेळी ते पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेणार आहेत. सरकारच्या मंत्रीमंडळ विस्ताराबाबत या भेटीत चर्चा होईल अशी शक्यता आहे. आज दुपारी 4.30 वाजता ते मुंबई विमानतळाकडे रवाना होणार आहेत. संध्याकाळी 5.30 वाजताच्या विमानानं ते दिल्लीला जातील. 
 
विधान परिषदेच्या 10 नवनियुक्त आमदारांचा शपथविधी
विधान भवन येथील सेंट्रल हॉलमध्ये 10 नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी होणार आहे. भाजपाचे प्रसाद लाड, उमा खापरे, प्रवीण दरेकर, श्रीकांत भारतीय राष्ट्रवादीचे एकनाथ खडसे, रामराजे निंबाळकर, काँग्रेसचे भाई जगताप, शिवसेनेचे सचिन अहिर आणि अमशा पाडवी हे आज शपथ घेतील.


आदित्य ठाकरेंची बंडखोरांच्या मतदारसंघात ‘निष्ठा यात्रा’
एकनाथ शिंदे गट शिवसेनेतून फुटल्यानंतर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे चांगलेच अॅक्टिव्ह झाले आहेत. शिवसेनेतील बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात शिवसेना नेते आदित्य ठाकरे दौरा करणार आहेत.  मुंबईतल्या शाखा शाखांमध्येही आदित्य ठाकरे पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत निष्ठा यात्रा काढणार आहेत.
 
संजय राऊतांची पक्षबांधणीला सुरुवात
शिंदे गटाच्या टार्गेटवर असलेले शिवसेना खासदार संजय राऊत आज नाशिक दौऱ्यावर आहेत. पक्ष बांधणीची सुरुवात राऊतांनी नाशिकपासून केली आहे. आज संजय राऊत पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार असून ते यावेळी नाशिक जिल्ह्याचा आढावा घेणार आहेत. नाशिकमधून माजी कृषीमंत्री दादा भुसे आणि सुहास कांदे शिंदे गटात गेले आहेत. 
 
राज्यात पुढचे चार ते पाच दिवस अती मुसळधार पावसाची शक्यता
पुढचे चार ते पाच दिवस कोकण, मध्य महाराष्ट्राच्या काही भागात अतिवृष्टीची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे सातारा, कोल्हापूरात आज रेड अलर्ट आहे.  मराठवाड्यात मध्यम ते जोरदार पाऊस पडू शकतो. विदर्भातही चांगला पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. 
 
मुंबईत रेड आणि ऑरेंज अलर्टच्या दिवशी समुद्रकिनाऱ्यावर जाण्यास बंदी 
यंदाच्या मान्सूनमध्ये समुद्रात बुडून 10 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.  या पार्श्वभूमीवर प्रशासनानं महत्वाचा निर्णय घेतला आहे. रेड आणि ऑरेंज अलर्टच्या दिवशी केवळ सकाळी 6 ते 10 या वेळेतच समुद्रकिनारी जाण्यास परवानगी असेल.  त्यानंतर बीचवर जाऊ नये अशी सूचना महापालिकेनं दिली आहे. अलर्टच्या पार्श्वभूमीवर समुद्रकिनारी लाईफगार्ड, स्पीड बोटस्, अग्नशमन दलाची संरक्षक यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.
 
वारी अपडेट
संत तुकारामांची पालखी पिराची कुरोली येथून निघेल आणि वाखरी येथे मुक्कामी असेल. बाजीराव विहिर येथे उभं रिंगण होईल. सत ज्ञानेश्वरांची पालखी भंडीशेगाव येथून निघेल आणि वाखरीला मुक्कामी असेल. बाजीरावची विहिर येथे उभं आणि गोल रिंगण होईल.