मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसात जे घडलंय ते नक्कीच ऐतिहासिक आहे. शिवसेना आजवर अनेक वेळा फुटली मात्र एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळं शिवसेनेत भलं मोठं भगदाड पडलं. एकनाथ शिंदे यांच्यासोबत फक्त 40 आमदाराच गेले नाही तर यामुळे महाविकास आघाडी सरकार अस्थिर झालं आणि उद्धव ठाकरे यांना राजीनामा द्यावा लागला. महाविकास आघाडी सरकार कोसळलं. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या गटाने भाजपसोबत युती करत राज्यात सत्ता स्थापन केली आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले.
आता एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री होताच उद्धव ठाकरेंना अजून एक मोठा धक्का दिला आहे. शिवसेनेचे 80 टक्के आमदार शिंदे गटात सामील झाल्यानं एकनाथ शिंदे यांनी थेट पक्षाच्या ‘धनुष्यबाण’ चिन्हावर दावा ठोकला आहे. पक्षाचं अधिकृत चिन्ह मिळवण्यासाठी रस्त्यावरची नाही तर कायदेशीर लढाई हाच एक उपाय असेल आणि शिंदे गट आता त्यासाठी देखील कोर्टात जाण्याच्या तयारीत आहे असं दिसतंय. त्यामुळे चिन्हाची लढाई कोण जिंकणार हे पाहणं महत्वाचं ठरेल.
शिवसेना आणि रेल्वे इंजिन
शिवसेनेला धनुष्यबाण हे चिन्ह मिळालं ते 1989 साली. त्याआधी अनेक निवडणुका शिवसेनेनं इतर वेगवेगळ्या चिन्हांवर लढवल्या होता. अगदी कप-बशीपासून ते ढाल-तलवार पर्यंत अनेक चिन्ह घेऊन बाळासाहेब ठाकरे निवडणुकांच्या रिंगणात उतरले होते. शिवसेनेनं आजवर वापरलेल्या चिन्हांच्या यादीत असं एक चिन्ह आहे जे सामान्य माणसाच्या भुवया उंचावू शकतं आणि ते चिन्ह म्हणजे रेल्वे इंजिन. 1978 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेनं हेच चिन्ह वापरलं होतं.
18 डिसेंबर 2005 रोजी राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडले आणि 09 मार्च 2006 रोजी त्यांनी स्वतःच्या पक्षाची स्थापना केली. तेव्हापासून आजपर्यंत राज ठाकरे यांच्या पक्षाचं चिन्ह हे रेल्वे इंजिन राहिलंय. मात्र हेच रेल्वे इंजिन शिवसेनेनं 1978 सालच्या विधानसभा निवडणुकीत वापरलं होतं. 1978 साली फेब्रुवारी–मार्च महिन्यात राज्यात विधानसभा निवडणुका पार पडल्या होत्या. त्यावेळी निवडणूक आयोगाकडून शिवसेनेला देण्यात आलेलं चिन्ह होतं रेल्वे इंजिन. याच चिन्हावर शिवसेनेचे अनेक बडे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. या उमेदवारांमध्ये मनोहर जोशी, सुधीर जोशी, प्रमोद नवलकर आणि गणेश नाईक यांच्यासारख्या दिग्गजांचाही समावेश होता. पक्षाच्या प्रत्येक बॅनरवर शिवसेना या चार अक्षरांसोबत रेल्वी इंजीनचं चित्र रुबाबात रेखाटण्यात आलं होतं. त्यावेळी मुंबईच्या गोरेगावात झालेल्या एका सभेत कोकणी माणसाला साद घालण्यासाठी बाळासाहेबांनी “कोकण रेल्वेला शिवसेनेचं इंजिन लावा” असं सुद्धा म्हटलं होत. मात्र निवडणुकीचा निकाल आला आणि शिवसेनेला जबर फटका बसला. पक्षाच्या सर्वच उमेदवारांचा दारूण पराभव झाला. असं म्हणतात की 1975 साली बाळासाहेबांनी इंदिरा गांधींच्या आणिबाणीला अप्रत्यक्षरीत्या समर्थन दिलं होतं आणि त्याचाच फटका त्यांना 1978 सालच्या या निवडणुकीत बसला.
थोडा इतिहास
शिवसेनेची स्थापना 19 जून 1966 रोजी झाली. मात्र स्थापनेवेळी शिवसेना ही फक्त एक संघटना होती आणि राजकीय पक्ष म्हणून तिची नोंद केली गेली नव्हती. या नोंदणीचा योग आला तो 1989 साली. 1988 साली निवडणूक आयोगानं सर्व राजकीय पक्षांची नोंदणी करून घ्यायचं ठरवलं आणि तसे प्रस्ताव देखील मागवून घेतले. शिवसेनेनं सुद्धा आपल्या पक्षाची एक घटना तयारी केली आणि प्रस्तावासह निवडणूक आयोगाकडे चाचणीसाठी पाठवली. कालांतरानं कागद पात्रांची सगळी पडताळणी झाली आणि निवडणूक आयोगाकडून निर्णय आला. आयोगाकडून शिवसेनेच्या घटनेला मान्यता देत शिवसेनाला राजकीय पक्ष म्हणून घोषित केलं गेलं. मात्र आवश्यक असलेली मतदानाची टक्केवारी नसल्यानं शिवसेनेचं चिन्ह नाकारलं.
पुढे त्याच वर्षी म्हणजे 1989 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजप पहिल्यांदा एकत्र येत निवडणुकीला सामोरं गेले होते. या निवडणुकीत शिवसेनेचा चार जागांवर विजय झाला आणि चिन्हं मिळवण्यासाठी लागणारी मतांची टक्केवारी पक्षानं प्राप्त केलं. निवडणूक आयोगानं देखील याची दाखल घेत शिवसेनाला धनुष्यबाण हे चिन्ह बहाल केलं आणि भगवान रामाचं शास्त्र म्हणून बाळसाहेब ठाकरे यांनी सुद्धा ते स्वीकारलं. त्यानंतर आजवर झालेल्या सर्व निवडणुकांमध्ये शिवसेनेनं हेच चिन्ह वापरलं.
मात्र आता शिवसेनेचं हेच चिन्ह धोक्यात आलं आहे. त्यामुळे बहुमताची लढाई जिंकलेले एकनाथ शिंदे ठाकरेंचा धनुष्यबाण हिसकावतील का हे नक्कीच पाहण्यासारखं असेल.