मुंबई: राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या सर्व घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामध्ये आज राजकीय, सामाजिक, आर्थिक घडामोडींपासून ते खेळ आणि मनोरंजनाच्या बाबतीत अपडेट्स देण्याचा प्रयत्न असतो. आपल्या प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत.
कोकण, पश्चिम महाराष्ट्रात पुढचे 4 दिवस रेड अलर्ट, अतिमुसळधार पावसाचा इशारा
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा आणि कोल्हापुरात पुढचे 5 दिवस हवामान विभागानं रेड अलर्ट जारी केलाय. मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक, पुण्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मध्य आणि उत्तर महाराष्ट्रातही मुसळधार पाऊस होईल असा अंदाज आहे. त्यामुळे, पुढचे 5 दिवस राज्यात सर्वदूर पाऊस पडणार आहे. काल संध्याकाळपासून सिंधुदुर्गात पावसाचा जोर कमी झाला होता. चिपळूणमध्ये मात्र पावसाचा जोर वाढत आहे. वाशिष्ठी नदी इशारा पातळीवर वाहत आहे.
पावसाचा जोर असाच राहिल्यास आज पंचगंगा, कृष्णा नदी धोक्याची पातळी ओलांडणार
कोल्हापुरात गेले दोन दिवस पावसाचा जोर चांगलाच वाढला. आजही कोल्हापूरला रेड अलर्ट आहे. कोल्हापूर शहराबरोबरच शिरोळ, हातकणंगले करवीर तालुक्यातील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास जनावरांसह स्थलांतरासाठी तयार राहा असं आवाहन प्रशासनानं नदी किनाऱ्यावरील नागरिकांना केलं आहे. जिल्ह्यात एनडीआरएफच्या दोन टीम तैनात करण्यात आल्या आहेत. सांगलीतही कृष्णा नदीच्या पातळीत वाढ होत आहे. जिल्ह्याचा आपत्ती व्यवस्थापन विभाग सतर्क झाला असून नदीकाठी काही बोटी तैनात करण्यात आल्या आहेत.
शिवसेनेचे 11 खासदार शिंदेंच्या संपर्कात?
राष्ट्रपती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या खासदारांचाही उद्धव ठाकरेंवर भाजप प्रणित उमेदवार द्रौपदी मुर्मूंना पाठिंबा देण्यासाठी दबाव वाढतोय. यात पहिलं पाऊल टाकलंय शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी. आता एकनाथ शिंदेच्या भूमिकेशी सहमत असलेले 11 खासदार शिंदेच्या संपर्कात आहेत अशी माहिती आहे. त्यामुळे, ठाकरे गटाला आणखी मोठा धक्का बसू शकतो.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ठाकरे सरकारच्या कामाचा आढावा घेण्याची शक्यता
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज मंत्रालयात येऊन कामकाजाचा आढावा बैठक घेण्याची शक्यता आहे. यावेळी उद्धव ठाकरे सरकाने घेतलेल्या निर्णयांच्या संदर्भात आढावा घेतला जाऊ शकतो अशी माहिती आहे.
शिंदे समर्थक आमदार मतदारसंघात परतणार..कुठे स्वागत, कुठे विरोध?
आमदार संतोष बांगर सकाळी 7 वाजता हिंगोलीत पोहचणार आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार त्यांना शिवसौनिकांच्या रोषाला सामोर जावं लागू शकतं.
मुंबई- शिंदे समर्थक आमदार प्रकाश सुर्वे यांच्याकडून शक्तीप्रदर्शन केले जाणार आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान ते अशोक वन परिसरात स्वागत रॅली काढली जाणार आहे. शेकडो कार्यकर्त्यांसह या शक्ती प्रदर्शनात सेना खासदार श्रीकांत शिंदे यांची हजेरी असेल.
जळगाव- बंडखोर आमदार गुलाबराव पाटील आणि किशोर पाटील जळगावमध्ये पोहोचणार आहेत. मंत्रीपद मिळाल्यानंतरच जल्लोष केला जाणार असल्याची माहिती गुलाबराव पाटील यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे. तर पाचोरा आमदार किशोर पाटील समर्थक मात्र आयत्या वेळी जल्लोष करण्याची शक्यता आहे.
धुळे- एकनाथ शिंदे यांच्या गटात गेलेल्या साक्री विधानसभा मतदार संघाच्या आमदार मंजुळा गावित आणि त्यांचे पती शिवसेनेचे जिल्हाप्रमुख डॉक्टर तुळशीराम गावित हे आज धुळ्यात येणार आहेत. त्यांचे स्वागत केले जाणार आहे.
वारी अपडेट
ज्ञानेश्वरांची पालखी आज माळिशरसहून निघून वेळापूरला पोहचेल. खुडूस फाटा येथे दुसरे गोल रिंगण पार पडेल. तुकोबांची पालखी आज अकलूजहून निघेल आणि बोरगावला मुक्कामी असेल. माळीनगर येथे उभं रिंगण होणार आहे.