मुंबई: राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामध्ये आज राजकीय, सामाजिक, आर्थिक घडामोडींपासून ते खेळ आणि मनोरंजनाच्या बाबतीत अपडेट्स देण्याचा प्रयत्न असतो. आपल्या प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत.


आज सोमवती आमावस्या, जेजुरीच्या खंडेरायाची मोठी यात्रा
जेजुरीच्या खंडेरायाची सर्वात मोठी यात्रा ही सोमवती आमावस्याला भरते. आज आमावस्या असल्यामुळे मोठ्या संख्येने भाविक कालपासूनच जेजुरीत खंडेरायाच्या दर्शनासाठी दाखल झाले आहेत. आज सकाळी 11 वाजता पालखीतून देव हे कऱ्हा स्नानासाठी नेले जातील. दुपारी साडे तीन वाजता देवाला कऱ्हा स्नान घातले जाईल. सोमवती आमवास्येला खंडेरायाची मोठी यात्रा असते. गेली दोन वर्षे ही यात्रा कोरोनामुळे भरली नव्हती. पंरतु आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने मोठ्या उत्साहात यंदाची सोमवती यात्रा भरणार आहे. यात्रेला 4 ते 5 लाख भाविक हे जेजुरीमध्ये खंडेरायाच्या दर्शनासाठी येणार असल्याची माहिती मंदिर विश्वस्तांनी दिली आहे. तसेच या यात्रेसाठी मंदिर प्रशासन आणि पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे.


राज्यसभेच्या निवडणुकीसाठी आज पियुष गोयल, अनिल बोंडे आणि धनंजय महाडिक अर्ज भरणार
राज्यसभेच्या निवडणुकीसाठी आज भाजपने तीन उमेदवार जाहीर केले आहेत. पियुष गोयल, अनिल बोंडे आणि धनंजय महाडिक हे आपल्या उमेदवारीचे अर्ज आज भरणार आहेत. भाजपने धनंजय महाडिकांच्या रुपाने तिसरा उमेदवार दिला आहे. त्यामुळे राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होणार नाही हे स्पष्ट झालं आहे. सहाव्या जागेसाठी आता शिवसेना आणि भाजप हे आमने-सामने आले असून शिवसेनेकडून संजय पवार आणि भाजपकडून धनंजय महाडिक हे कोल्हापूरचे दोन मल्ल झुंजणार आहेत. 


काँग्रेसकडून पुन्हा आयात उमेदवाराला संधी, इम्रान प्रतापगडी यांना उमेदवारी
कॉंग्रेसकडून राज्यसभेसाठी अल्पसंख्यांक विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष इम्रान प्रतापगडी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. कॉंग्रेसने  विविध राज्यांमध्ये होणाऱ्या आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी नावांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये महाराष्ट्र, छत्तीसगड, हरियाणा, कर्नाटक, मध्यप्रदेश, राजस्थान, तामिळनाडू या राज्यांतील उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. राज्यसभेकरता तरुणांना संधी देण्याचा कॉंग्रेसचा मानस आहे. उदयपूर चिंतन शिबिरात देखील तरूणांना संधी देण्याबाबत प्रस्ताव देखील मंजूर झाला आहे. इम्रान प्रतापगडींसोबत कन्हैय्या कुमार, बी.व्ही श्रीनिवास यांचीही नावे चर्चेत होती. मात्र, कॉंग्रेसच्या गोटातून महाराष्ट्रातील जागेसाठी इम्रान प्रतापगडींच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. 


अविनाश भोसलेंना जेल की बेल? रीमांडला विरोध करणाऱ्या याचिकेवर सीबीआय बाजू मांडणार
सीबीआयच्या नजरकैदेत ठेवलेल्या अविनाश भोसलेंना आज पुन्हा मुंबई सत्र न्यायालयात हजर केलं जाईल. भोसले सध्य् सीबीआयच्या बीकेसीतील विश्रामगृहात आहेत. सीबीआयनं भोसलेंची 10 दिवसांकरता रीमांड मागितली होती. मात्र सीबीआयची कारवाई बेकायदेशीर असल्याचा दावा करत भोसलेंच्यावतीनं रीमांडला विरोध करण्यात आलाय. भोसलेंच्या रीमांडला विरोध करत दाखल केलेल्या अर्जाला उत्तर देण्यासाठी सीबीआय आज कोर्टात आपली भुमिका मांडणार.


परिचारिकांची बेमुदत संपाची हाक
परिचारिकांच्या आंदोलनाची धार आता आणखी तीव्र होण्यास सुरुवात झाली आहे. कारण आंदोलकांनी बेमुदत संपाची हाक दिली आहे. त्यामुळें मुंबईतील प्रसिद्ध जे जे रुग्णालयातील ज्या नियोजित शस्त्रक्रिया आहेत त्या पूढे ढकलण्यात आल्या आहेत. सध्या परिचारिकांची संख्या रोडावली असल्यामुळे मुंबईतील अनेक सरकारी रुग्णालयांत हीच परिस्थिती पाहिला मिळतं आहे. या सर्व परिचारिकांनी कंत्राटी पद्धतीने जागा भरण्यास विरोध केला आहे.


अकरावी प्रवेशसाठी आजपासून ऑनलाइन अर्ज भरायला सुरुवात
अकरावी प्रवेशसाठी आजपासून ऑनलाइन अर्ज भाग 1 भरायला सुरवात होणार.  मुंबई महानगर, पुणे , पिंपरी चिंचवड, नाशिक, अमरावती, नागपूर या विभागांमध्ये अकरावी ऑनलाइन प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया आजपासून सुरू होत आहे. प्रत्यक्ष अर्ज नोंदणी व अर्जाचा भाग एक भरण्यासाठी सुरवात होणार आहे. यामध्ये विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज करून लॉग इन आयडी व पासवर्ड मिळवायचा आहे तसेच अकरावी प्रवेशाचा भाग 1, ऑनलाइन शुल्क व अर्ज प्रमाणित करण्यासाठी मार्गदर्शक केंद्र निवडायचे आहे. तर दहावीच्या निकालानंतर विद्यार्थ्यांनी आपला पसंती क्रमांक देऊन अर्जाचा भाग-2 भरायचा आहे.