Todays Headline : ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी...  या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू.


रामदास कदम खानापूर न्यायालयात हजर होणार -
रामदास कदम यांची बेळगावच्या पार्श्वभूमीवर आज सुनावणी होणार आहे. 2004 मध्ये बेळगावच्या मराठी महापौरला तीथल्या बेळगांवच्या लोकांनी काळे फासले होते.. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांनी रामदास कदम यांना तीथे पाठवले होते. रामदास कदम यांनी खानापूर येथे जाहीर सभा घेतली  या सभेत भडकावू भाषण केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. यासंदर्भात मागिल महिन्यात रामदास कदम यांनी 10 लाखांचा जामीनही घेतला होता.. त्यानंतर पुन्हां बेळगावच्या खानापूर न्यायालयाने रामदास कदम यांना न्यायालयात आज सकाळी 11 वाजता हजर राहण्यास सांगितले आहे..जर हजर राहिले नाहीत तर अटक वॉरंट निघू शकेल.. यासाठी रामदास कदम फ्लाइट ने बेळगांव च्या दिशेने रवाना झाले आहेत.


पुण्यात वाडेश्वर कट्टा -
पुण्यातील वाडेश्वर कट्टा हा प्रसिद्ध आहे तिथे अनेक नेते मंडळी मोकळ्या गप्पा मारत असतात. उद्या होणारा वाडेश्वर कट्टा हा खास असणार आहे कारण सर्वपक्षीय आमदार खासदार एकाच मंचावर येऊन दिवाळीचा फराळ एकमेकांना वाटतील..


आदित्य ठाकरे नाशिक दौऱ्यावर -
आदित्य ठाकरे आज पुण्यात दिवाळी निमित्ताने कार्यकर्त्यांशी भेटणार आहेत. त्यानंतर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना देखील भेटणार अशी माहिती आहे. पुण्यानंतर आदित्य ठाकरे नाशिक जिल्हा दौऱ्यावर जाणार आहेत. अतिवृष्टीमुळे  सिन्नर तालुक्यात झालेल्या नुकसानीची पहाणी करणार आहेत.


शेतकऱ्यांचा अभ्यास मेळावा -
आटपाडी, सांगोला आणि तासगांव तालुक्यातील शेतकऱ्यांचा अभ्यास मेळावा आज आटपाडी मधील कृषितंत्र विद्यालयाच्या प्रागणात  पार पडणार आहे. या मेळाव्यास शरद पवार  यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. शिवाय राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, डॉ. भारत पाटणकर.के.जे.जॉय,  हिमांशु कुलकर्णी  अब्राहम सॅम्युएल या मान्यवरांचीही मेळाव्यास उपस्थिती पार पडणार आहे.


आजम खान यांच्याविरोधात कोर्टात सुनावणी -
प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी समाजवादी पार्टीचे नेते आजम खान यांच्याविरोधात आज कोर्टात सुनावणी होणार आहे.  रामपूरच्या एमपी-एमएलए कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीवेळी भाषण करताना आजम खान यांनी प्रक्षोभक वक्तव्य केलं होतं. याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. दुपारी 12 वाजता कोर्टात सुनावणी होणार आहे. 


संरक्षण मंत्री राजनाथ सिंह श्रीनगर दौऱ्यावर -
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज श्रीनगर दौऱ्यावर जाणार आहेत.  इंफेंट्री-डेच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या कार्यक्रमात ते सहभागी होणार आहेत. शौर्य दिवस साजरा करण्यात येणार आहे. 


अमित शाह हरियाणा दौऱ्यावर - 
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री,अमित शाह येत्या 27 आणि 28 ऑक्टोबर 2022 रोजी हरियाणा येथील सूरजकुंड येथे होणाऱ्या विविध राज्यांच्या गृहमंत्र्यांच्या 'चिंतन शिबिराचे' अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी या चिंतन शिबिराला दिनांक 28 ऑक्टोबर 2022 रोजी संबोधित करतील.  सर्व राज्यांच्या गृहमंत्र्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांच्या नायब राज्यपाल आणि प्रशासकांना या दोन दिवसीय चिंतन शिबिरात सहभागी होण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.राज्यांचे गृहसचिव, पोलीस महासंचालक आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आणि केंद्रीय पोलीस संघटनांचे महासंचालकही या चिंतन शिबिरात सहभागी होणार आहेत. 'चिंतन शिबिरा'मध्ये सहा सत्रांमध्ये विविध विषयांवर चर्चा होणार आहे.  परिषदेच्या पहिल्या दिवशी होमगार्ड, नागरी संरक्षण (सिव्हिल डिफेन्स),अग्निसुरक्षा( फायर प्रोटेक्शन),शत्रूंच्या मालमत्ता (एनिमी प्रॉपर्टी) अशा अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे.
 
अंगरक्षकांना सिल्वर ट्रम्पेट -
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु आज राष्ट्रपतींच्या अंगरक्षकांना सिल्वर ट्रम्पेट आणि ट्रम्पेट बॅनर प्रदान करणार आहेत. राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. जवळपास दीड तास हा कार्यक्रम होणार आहे. 
 
भारताचा दुसरा सामना -
ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या टी 20 विश्वचषकात रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडियाचा आज नेदरलँडविरोधात सामना होणार आहे. पाकिस्तानचा पराभव केल्यानंतर भारतीय संघाचा आत्मविश्वास वाढलेला असेल. दुसऱ्या सामन्यात विजय मिळवत सेमी फायनलचं तिकिट निश्चित करण्याच्या इराद्यानं आणखी एक पाऊल टाकेल. या सामन्यात हार्दिक पांड्याला विश्रांती मिळण्याची शक्यता आहे.