मुंबई: राज्यात बलिप्रतिपदा ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा केली गेली. त्यानिमित्ताने राज्यभरातील गवळी बांधव आणि नागरिकांनी त्यांच्या गोधनाची पूजा केली, त्यांच्या मिरवणुका काढल्या. राज्यातील विविध भागात विविध प्रथा पाळल्या जात आहेत. काही ठिकाणी म्हशींच्या शर्यतीच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आलं होतं, तर काही ठिकाणी आगीतून गुरं उडवण्याची स्पर्धा रंगली. 


वाशिममध्ये भव्य मिरवणूक 


आज बलिप्रतिपदा निमित्त वाशिममध्ये मुस्लीम गवळी समाजाच्या वतीने रेड्यांची आणि म्हशींची मिरवणूक काढण्यात आली. गेल्या  दोन वर्षात कोरोनाच्या निर्बंधांमुळे मिरवणूक काढता आली नव्हती. मात्र यावर्षी कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याने सर्व सण उत्सव मोठ्या जल्लोषात साजरे केले जात आहेत. जिह्यात यावर्षी सजवलेल्या रेड्यांची मिरवणूक काढून परंपरा जोपासली.


चंद्रपुरात गोधनाची पूजा, 400 वर्षांहून जुनी परंपरा जोपासली 


चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यात निंबाळा, घोट, हेटी व चालबर्डी या चार गावांच्या सीमेवर बलिप्रतिपदेला गायगोधन आणि ढालपूजा केली जाते. ऐतिहासिक परंपरेचा वारसा लाभलेली ही गायगोधन पूजा विदर्भातील आदिवासी गोंड गोवारी जमातीतर्फे आजही श्रद्धेने, पारंपरिक पद्धतीने साजरी केली जाते. यंदाही हा उत्साह कायम दिसून आला. गावामधील गोपालक पूजेसाठी आपल्या गायी पटांगणावर घेऊन आले. अंदाजे 400 वर्षापेक्षाही जुनी असलेली ही परंपरा अजूनही सुरू आहे. 


गायी राखणे हा गोंड गोवारी जमातीच्या लोकांचा पारंपरिक व्यवसाय. त्यामुळे हे लोक गायींची तितक्याच भक्तिभावाने पूजा करून तिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात. दीपावलीच्या चौथ्या दिवशी बलिप्रतिपदेला गायगोधन व ढाल पूजेचा (काठीपूजा) उत्सव साजरा केला जातो. घरी गायींची पूजा केल्यानंतर सार्वजनिक पूजेसाठी गायींना गायगोधनाच्या पटांगणावर आणले जाते. प्रथेनुसार चारही गावांच्या शिवारांची आणि देवतांची पूजा करून शीव बांधण्यात येते. आराध्य दैवत वाघोबाच्या मूर्तीची पूजा करण्यात येते. गेल्या अनेक वर्षांपासूनची ही परंपरा आजही गोपालक, आदिवासी बांधवांनी कायम राखली आहे.


परळीत म्हशी पळवण्याची प्रथा 


बीडच्या परळीमध्ये पाडव्यानिमित्त म्हशी पळवण्याची परंपरा असून यावर्षी देखील दिवाळी आणि पाडव्याच्या निमित्ताने परळी मधील गवळी बांधवांनी आपल्या म्हशींना सजवून आणलं होतं. या म्हशींची पळवण्याची स्पर्धा घेण्यात आली. दरवर्षी गवळी बांधव पाडव्यानिमित्त मोठ्या उत्साहात म्हशी पळवण्याचा सण साजरा करतात आणि या वर्षी देखील परळीतल्या विविध भागांमध्ये सजवलेल्या म्हशी मोठ्या उत्साहात पळवून परळीतील नागरिकांनी पाडवा सण साजरा केला आहे.


बेळगावात म्हशींच्या शर्यती 


दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने बेळगावात म्हशी पळविण्याच्या आगळ्या वेगळ्या अशा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. गेल्या अनेक वर्षापासून बेळगावात दिवाळी पाडव्याच्या दिवशी म्हशी पळवण्याच्या शर्यतीचे उत्साहाने आयोजन केले जाते. शर्यतीची तयारी महिनाभर अगोदर शेतकरी आणि गवळी बांधव करत असतात. दिवाळी पाडव्याच्या दिवशी म्हशीला अंघोळ घालून शिंगांना रंगरंगोटी केली जाते. शिंगांना मोरपिसे आणि रिबन देखील बांधण्यात येते. म्हशीला गोडधोड खायला घालून पूजण्यात येते. नंतर सजवलेल्या म्हशींना शर्यतीत भाग घ्यायला लावलं जातं. गवळी गल्लीसह शहापूर, वडगाव, अनगोळ आदी भागात म्हशींच्या शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. म्हशींची शर्यत पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती.


वर्ध्यात बलिप्रतिपदा उत्साहात साजरी


बलिप्रतिपदा हा सण वर्धा जिल्ह्यात सर्व शेतकरी आणि गवळी बांधव मोठ्या उत्साहाने साजरे करतात. यावर्षी देखील परंपरेनुसार सर्व गाईंना रंगवण्यात आलं, त्यांची पूजा करण्यात आली. गावात छोटी मिरवणूक काढून नंतर अंगणात शेणाचा प्रतिकात्मक महिषासूर तयार करून सायंकाळी गाईच्या पायांनी या महिषासुराला तुडवत वध करण्याची परंपरा जपण्यात आली. सर्व गवळी बांधवांनी वाजत गाजत हा सण साजरा केला आहे.


माळशिरस तालुक्यात मेंढ्यांचं रिंगण


दिवाळी पाडव्यानंतर माळशिरस तालुक्यातील मेंढपाळ बांधव आपल्या मेंढ्या घेऊन मराठवाडा भागात चरायला घेऊन जातात. त्यापूर्वी रेडे गावात ग्राम दैवताला मेंढ्यांचे गोल रिंगण घालतात. बाहेरगावी जाताना आपल्या देवाचा आशीर्वाद असावा या भावनेने हे रिंगण घालण्याची शेकडो वर्षांची परंपरा आजही जपली आहे.


कल्याणमध्ये शेतकऱ्यांकडून बलिप्रतिपदा साजरी, बैलांची मिरवणूक 
 
ठाणे रायगड जिल्ह्यात दिवाळीत येणारा बलिप्रतिपदा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. ठाणे रायगड जिल्ह्यातील शेतकरी बलिप्रतिपदेच्या दिवशी गायी, बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करतात. कल्याणमध्ये देखील शेतकरी वर्गाने बलिप्रतिपदा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.


ठाणे जिल्ह्यात आगीतून गुरं उडवण्याची प्रथा, बलिप्रतिपदेच्या दिवशी केली जाते गुरांची पूजा
 
ठाणे जिल्ह्यात आज बलिप्रतिपदेच्या दिवशी गुरं उडवण्याची प्रथा आहे. आजच्या दिवशी घरातील जनावरांचं पूजन करून त्यांना गवताच्या जळत्या पेंडीतून उड्या मारायला लावल्या जातात. यामुळे वर्षभर जनावरांचं आरोग्य चांगलं राहतं, अशी शेतकऱ्यांची भावना आहे.


दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजेच बलिप्रतिपदा. ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात पावसाळ्यानंतर दिवाळीत शेतीच्या कामाला सुरुवात करण्यात येते. दिवाळीच्या कालखंडात भात घरी येतो. यावेळी जनावरांची कामं पुन्हा एकदा सुरू होतात. त्यामुळेच जनावरांची दरवर्षी बलिप्रतिपदेच्या दिवशी आंघोळ घालून पूजा केली जाते. त्यांना दिवाळीचा फराळ आणि गोडधोड भरवलं जातं. त्यानंतर गावात गवताची पेंड पेटवून त्यावरून ही गुरं उडवली जातात. असं केल्यामुळे जनावरांच्या अंगावरील कीटक, जंतू मरतात आणि त्यांना कोणत्याही रोगाची लागण होत नाही. आगामी वर्षभर गुरांचं आरोग्य चांगलं राहतं, अशी शेतकऱ्यांची भावना आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ठाणे आणि रायगड जिल्ह्यात आणि प्रामुख्याने आगरी समाजात ही प्रथा पाळली जाते.


नंदुरबारात रेड्यांची आणि पाळीव गाई-म्हशींची मिरवणूक 


संगणक आणि इंटरनेटच्या युगातही गवळी समाजातर्फे शेकडो वर्षापासून सगर उत्सवाची परंपरा टिकून आहे. दरवर्षी दिपावलीनिमित्त मुक्या प्राण्यांचा सगर उत्सव नंदुरबार शहराचे आकर्षण असते.  बलिप्रतिपदा निमित्त गवळी समाजातर्फे सगर उत्सवानिमित्त रेड्यांची आणि पाळीव गाई-म्हशींची मिरवणूक काढण्यात येणार आहे.


राज्यात ज्या-ज्या ठिकाणी गवळी समाज आहे, तेथे दिवाळी सणाच्या काळात सगर उत्सव अर्थात रेड्यांसह गाई-म्हशींच्या पूजनाला महत्त्व आहे. वीरशैव लिंगायत गवळी समाजातर्फे म्हैस आणि रेडाच्या माध्यमातून बंधुभाव जोपासण्यासाठी शेकडो वर्षापासूनची परंपरा आजही तग धरून आहे. दिवाळीत एकमेकांना शुभेच्छा देण्यासाठी समाज बांधव एकत्र होतात. या उत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे सगर अर्थात रेड्यांची मिरवणूक काढली जाते. तसेच पंच मंडळींच्या निर्णयानंतर रेड्यांची झुंज देखील लावली जाते. 


कोल्हापुरात म्हशी पळवण्याच्या स्पर्धा 


कोल्हापूरच्या कसबा बावडा या ठिकाणी दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने म्हशी पळवण्याच्या स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं. कोल्हापुरातील ही स्पर्धा पाहण्यासाठी लोकांनी एकच गर्दी केली होती. मालक आणि म्हैस यांच्यातील नातं स्पष्ट  करणारी स्पर्धा असल्याचं सांगण्यात येतंय.