Todays Headline : ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी... या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू.
आज धनत्रयोदशी
धनत्रयोदशी 23 ऑक्टोबरच्या संध्याकाळी 5:04 पर्यंत असेल. राहू काल सकाळी 9 ते 10:30 पर्यंत राहील. कुंभ दुपारी 3.38 ते 5:6 पर्यंत राहील आणि 8.41 ते 10.55 पर्यंत वृषभ राशीत राहील. दरवर्षी कार्तिक कृष्ण पक्षातील त्रयोदशी हा धन्वंतरी दिन म्हणून साजरा केला जातो. भगवान धन्वंतरी पृथ्वीवर येण्यापूर्वी आयुर्वेद गुप्त अवस्थेत होता. त्यांनी आयुर्वेदाचे आठ भाग करून सर्व रोगांवर औषधोपचाराची पद्धत विकसित केली अशी अख्यायिका आहे. आयुर्वेदाचे संस्थापक आणि वैद्यकीय शास्त्राचे देवता भगवान धन्वंतरी हे आरोग्य, वय आणि तेज यांची देवता असल्याचं मानलं जातंय. आरोग्यदेव धन्वंतरी हे प्राचीन भारतातील एक महान चिकित्सक होते. दीपावलीच्या दोन दिवस अगोदर कार्तिक त्रयोदशी या दिवशी धनत्रयोदशी हा सण साजरा केला जातो. या दिवशी मानवी समाजाला दीर्घायुष्य प्रदान करण्यासाठी प्रार्थना केली जाते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या रायगड दौऱ्यावर
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रविवारी 23 ऑक्टोबर 2022 रोजी रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. रायगडमध्ये विविध कार्यक्रमांना मुख्यमंत्री हजेरी लावणार आहेत.
उद्धव ठाकरे आज औरंगाबाद दौऱ्यावर
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज औरंगाबादमधील दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत.
नागपूरमध्ये भाजपचा दिवाळी मिलन कार्यक्रम
भाजप कार्यकर्त्यांच्या दिवाळी मिलन कार्यक्रमाला नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित राहणार आहेत, भट सभागृह, संध्याकाळी सहा वाजता कार्यक्रम होईल.
पंतप्रधान मोदी अयोध्येच्या दौऱ्यावर
पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येच्या दौऱ्यावर आहेत. संध्याकाळी पाच वाजता मोदी अयोध्येत प्रभू रामाचं दर्शन घेतील आणि पूजा करतील. संध्याकाळी ५.४५ वाजता श्रीरामाचा राज्याभिषेक होणार आहे.
श्रीहरिकोटा येथे इस्रोचे सर्वात वजनदार रॉकेट LVM-3 चे प्रक्षेपित होणार
भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो त्यांच्या पुढील आणि महत्त्वपूर्ण प्रक्षेपणासाठी सज्ज आहे. हे मिशन LVM3 M2/OneWeb India1 आहे. हे मिशन इस्रो आपल्या सर्वात वजनदार रॉकेट 'LVM-3' वरून म्हणजेच लाँच व्हेईकल मार्क 3 आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटा येथून प्रक्षेपित करेल.
काँग्रेसची 'भारत जोडो यात्रा' आज तेलंगणात पोहोचणार
राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसची 'भारत जोडो यात्रा' आज सकाळी कर्नाटकातील रायचूरहून तेलंगणातील गुडेबेलूरमध्ये दाखल होणार आहे.
टी-20 वर्ल्डकपमध्ये भारत-पाक आमनेसामने
आज मेलबर्नमध्ये भारताचा टी-20 वर्ल्डकपमधील पहिला सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानसोबत होणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी दीड वाजता सामना सुरु होईल.