Maharashtra Aanandacha Shidha News: राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. सिल्लोड मतदारसंघात सरकारतर्फे देण्यात येणारा आनंदाचा शिधा मोफत देणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. मतदारसंघातील जवळपास एक लाख लोकांचे शंभर रुपये अब्दुल सत्तार भरणार आहेत. यामुळं सिल्लोड - सोयगाव मतदार संघातील जनसामान्यांची दिवाळी गोड होणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून आनंदाचा शिधा उपक्रम चालवला जात आहे. यामध्ये काही ठिकाणी गोंधळ झाल्याचं देखील पाहायला मिळालं. कुठे शिधा पोहोचलाच नाही तर कुठे जास्त पैसे घेतल्याचं समोर आलं होतं. दुसरीकडे राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडून सिल्लोड - सोयगाव मतदार संघातील रेशनकार्ड धारकांना आनंद शिधा मोफत मिळणार आहे.
राज्य शासनाने यासाठी 100 रुपये शुल्क आकारले आहेत. मात्र बाळासाहेबांची शिवसेना आणि कृषिमंत्री अब्दुल सत्तार मित्र मंडळाच्या वतीने आनंद शिधाचे शुल्क भरण्यात आले आहे. त्यामुळे सिल्लोड - सोयगाव मतदार संघातील जवळपास 1 लाख शिधा पत्रिका धारकांना रेशन दुकानातून आनंद शिधा किट मोफत मिळणार आहे.
अब्दुल सत्तार मित्र मंडळाच्या वतीने दिवाळीच्या भेट स्वरूपात आनंद शिधा किट मोफत देण्यात येत आहे. त्यामुळे शिधाकार्ड धारकांनी आनंद किट साठी शुल्क देऊ नये तसेच आपापल्या रेशन दुकानातुन सदरील आनंद शिधा किट घेऊन जावी असे आवाहन बाळासाहेबांची शिवसेनेच्या वतीने करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या घोषनेनुसार अल्प दरात एक किलो रवा, एक किलो साखर, एक किलो चना डाळ, एक किलो पामतेल पदार्थ किट अल्प दरात म्हणजेच 100 रुपयात भेट देण्यात येत आहे. मात्र सिल्लोड मतदार संघातील राबविण्यात येणाऱ्या मोफत आनंद शिधा किट वाटप उपक्रमामुळे शिधा पत्रिका लाभार्थी सर्व सामान्य जनतेची दिवाळी गोड होण्यास मदत होणार आहे.