मुंबई: राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या सर्व घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामध्ये आज राजकीय, सामाजिक, आर्थिक घडामोडींपासून ते खेळ आणि मनोरंजनाच्या बाबतीत अपडेट्स देण्याचा प्रयत्न असतो. आपल्या प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत.


शिंदे गट विरुद्ध उद्धव गटाच्या याचिकांवर सुप्रीम कोर्टात सुनावणी
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर आज महत्त्वाची सुनावणी होणार आहे. एकनाथ शिंदे गटाचे मुख्य प्रतोद भरत गोगावलेंनी अजय चौधरींच्या नियुक्तीविरोधात आणि झिरवळांच्या 16 आमदारांच्या अपात्रतेच्या नोटीसीविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. सुभाष देसाई, सुनील प्रभू यांनी विधानसभा अध्यक्षांची निवड, बंडखोर आमदारांच्या पाठिंब्यावर सरकार स्थापनेची परवानगी देण्याचा राज्यपालांचा निर्णय या बाबींना सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं आहे. या सगळ्या याचिकांवर एकत्रितपणे आज सुनावणी होणार आहे चीफ जस्टिस एन व्ही रमण्णा, जस्टिस कृष्ण मुरारी आणि हिमा कोहली यांच्या बेंचसमोर सकाळी 11.30 वाजता ही सुनावणी होणार आहे.


ओबीसी आरक्षणाची सुनावणी आज
राज्यातील ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाचा (OBC Political Reservation) फैसला आज होणार आहे. या प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार असून महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचं त्याकडे लक्ष लागलं आहे. महाराष्ट्रात पुन्हा ओबीसींना राजकीय आरक्षण मिळणार का? बांठिया आयोगाचा अहवाल सुप्रीम कोर्ट ग्राह्य धरणार का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज मिळणार आहेत. 


ओबीसी आरक्षणप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी पार पडणार आहे. राज्यात ओबीसींची लोकसंख्या 37 टक्के असून त्यांना 27 टक्के आरक्षण देण्याची शिफारस आयोगाने केली आहे. माजी मुख्य सचिव जयंतकुमार बांठिया आयोगाचा अहवाल स्वीकारुन न्यायालय ओबीसींसाठी 27 टक्के आरक्षण मान्य करणार का, या मुद्द्यावर ही महत्वपूर्ण सुनावणी होणार असल्याने न्यायालयाच्या निर्णयाकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.


संजय राऊतांना पुन्हा ईडीचं समन्स, आज हजर राहण्याचे निर्देश 
पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांना ईडीने पुन्हा एकदा समन्स बजावला असून आज त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सकाळी 11 वाजता त्यांना मुंबईतील ईडी कार्यालयात चौकशीसाठी बोलवलं आहे. संजय राऊत अधिवेशनासाठी दिल्लीत असल्यानं आज चौकशीला हजर राहणार का हे पाहावं लागेल.


राणा दाम्पत्याच्या संबंधित मुंबई पोलिसांच्या अर्जावर आज सुनावणी
खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या जामीनासाठी मुंबई पोलिसांच्या अर्जावर आज सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. दोघांनाही खार पोलिसांनी १५३(ए) अंतर्गत अटक केली होती. या प्रकरणात दोघांना जामीन मंजूर करताना न्यायालयाने काही अट घातली होती. परंतु पोलिसांच्या म्हणण्यानुसार त्यांनी जामीन अट पाळली नाही.


जीएसटीच्या वाढीविरोधात आज राष्ट्रवादीचे आंदोलन
केंद्र सरकारच्या अन्यायकारक जीएसटी वाढीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं मुंबईत आंदोलन करण्यात येणार आहे. पाकिट बंद खाद्यपदार्थांवर केंद्र सरकारने पाच टक्के जीएसटी लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये दही, लस्सी, तांदूळ, रवा यासारख्या दैनिदिन वस्तुंचा समावेश आहे. 


राज्यभर पावसाचा जोर कमी होणार
आज राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. विदर्भातील काही जिल्ह्यांत धरणांतून सोडलेल्या पाण्यामुळे पूरस्थिती आहे. काही ठिकाणी पूर ओसरला आहे. एकूणच पावसाचा जोर कमी झाला आहे. 


आज श्रीलंकेच्या नव्या राष्ट्रपतींची निवड होणार
रानिल विक्रमसिंघे, डल्लास अल्हाप्पेरुमा आणि अनुरा कुमारा दिसानायके या तिघांमध्ये राष्ट्रपती पदासाठी लढत होणार आहे. भारतीय वेळेनुसार सकाळी 10 वाजता निवडीची प्रक्रिया सुरु होईल. दुपारी 4 वाजेपर्यंत निकाल हाती येईल. महगाईविरोधातील जन आंदोलनानंतर राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे देश सोडून पळाले होते. त्यानंतर त्यांनी राजीनामा दिला होता.