Shiv Sena : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना एका पाठोपाठ एक धक्के बसत आहेत. आमदार आणि खासदारांच्या बंडखोरीनंतर लोकसभेतही ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. खासदार राहुल शेवाळे यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडून शेवाळे यांच्या नावाला मंजूरी देण्यात आली आहे.
आज 12 खासदारांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र दिले होते. त्यानंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी नव्या गटनेत्यांना मंजुरी दिली. शिवसेनेतील बंडखोर खासदारांकडून वेगळा गट स्थापन करण्यासाठी हालाचाली सुरू झाल्या होत्या. शिंदे गटात सामिल झालेल्या 12 खासदारांनी स्वतंत्र गट स्थापन करण्याबाबत लोकसभा अध्यक्षांसोबत आज सकाळी चर्चा केली होती. शिंदे गटाने दिलेल्या पत्रात लोकसभा सचिवालयाने बदल सुचवले होते.
शिंदे गटातील काही शिवसेना खासदारांनी आज सकाळी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची त्यांच्या दालनात भेट घेतली होती. या भेटीत खासदारांची संख्या आणि त्या संदर्भातील नियम यावर चर्चा करण्यात आल्याची माहिती समोर आली होती. लोकसभा सचिवालयाने शिंदे गटाच्या पत्रात बदल सुचवले होते. शिंदे गटाने आपले पत्र मुख्य प्रतोदांच्या नावाने द्यावेत अशी सूचना केली असल्याची माहिती मिळाली होती. शिवसेनेचे लोकसभेतील गटनेते विनायक राऊत हे शिंदे गटासोबत नाहीत. शिंदे गटाकडून राहुल शेवाळे यांना गटनेता नेमण्यात यावे असे पत्र लोकसभा अध्यक्षांना दिले होते.
आमदारांपाठोपाठ शिवसेनेचे खासदारही पक्षाविरोधात भूमिका घेणार असल्याची चर्चा होती. अखेर आज ही चर्चा खरी ठरली. शिवसेनेच्या 12 खासदारांनी शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे.
शिंदे गटासोबत गेलेले खासदार
- राहुल शेवाळे
- भावना गवळी
- कृपाल तुमाने
- श्रीकांत शिंदे
- धैर्यशील माने
- संजय मंडलिक
- हेमंत गोडसे
- सदाशिव लोखंडे
- प्रतापराव जाधव
- श्रीरंग बारणे
- राजेंद्र गावीत
- हेमंत पाटील
महत्वाच्या बातम्या - Shivsena-BJP : उद्धव ठाकरे भाजपसोबत युतीसाठी तयार होते पण...; खासदार राहुल शेवाळे यांचे गौप्यस्फोट
- मी माझ्या परीने युतीसाठी प्रयत्न केले, आता तुम्ही तुमच्या पातळीवर करा, शिवसेना पक्षप्रमुखांनी युतीसाठी दिला होता ग्रीन सिग्नल; राहुल शेवाळेंचा गौप्यस्फोट