बीड : आमदारांपाठोपाठ खासदारदेखील उद्धव ठाकरे यांना आणि शिवसेनेला सोडून शिंदे गटात गेल्याने सर्वसामान्य शिवसैनिक अस्वस्थ आहेत. आमदार, खासदार आणि पदाधिकारी जरी पक्षाला सोडून गेले असले तरी सामान्य शिवसैनिक मात्र अद्याप पक्षासोबत आहेत. अनेक प्रकारे शिवसैनिक स्वतःची निष्ठा दाखवत आहेत. अंबाजोगाई येथे देखील एका शिवसैनिकाने स्वतःच्या रक्ताने पत्र लिहून पक्षावरील निष्ठा दाखवली आहे.


शिवसेना आणि शिवसैनिकांच्या जीवावर जे मोठे झाले, आमदार-खासदार अशी अनेक पदे मिळविली त्यांनीच शिवसेना सोडली. मात्र, आम्ही उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. या आशयाचे पत्र अंबाजोगाई येथील युवासेनेचे पदाधिकारी अक्षय भूमकर यांनी लिहलं आहे. अक्षय भूमकर यांनी स्वतःच्या रक्ताची शाई करून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना हे प्रतिज्ञापत्र लिहिले आहे.


काय लिहिलं आहे या पत्रात
''मी शिवसेना आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ माझ्या स्वतःच्या रक्ताने लिहिलेले प्रतिज्ञापत्र एक शिवसैनिक म्हणून सादर केले. ज्यांना ज्यांना शिवसेनेने मोठे केले असे आमदार, खासदार पदाधिकारी हे सर्वजण आज पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची साथ सोडून जात आहेत. मात्र, शिवसेना या चार अक्षरांपासून मिळालेली ओळख हेच सर्वसामान्य शिवसैनिकांसाठी पुरेसे आहे. ते आजही तन-मन-धनाने उद्धव ठाकरे आणि शिवसेनेसोबतच आहेत."


शिवसैनिक शिवसेना हे चार अक्षरी नाव ज्वलंत ठेवण्यासाठी परिश्रम घेतील, असा आशावाद अक्षय भूमकरने आपल्या प्रतिज्ञापत्रात व्यक्त केला आहे.


महत्त्वाच्या बातम्या :