Baramati News: बारामती तालुक्यातील कोर्‍हाळे बुद्रुक (baramati) परिसरात ऊसतोडणीसाठी आलेल्या कामगाराच्या मुलावर हल्ला केला आहे. दोन वर्षीय मुलाच्या तोंडाला भटक्या कुत्र्याने (Dog) चावा घेतला आहे. यात मुलाचा पूर्ण जबडा आणि ओठ फाटले आहेत. या मुलाच्या जबड्यावर तब्बल 55 टाके घालत डॉक्टरांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करत मुलाची शस्त्रक्रिया केली आहे. युवराज राठोड असं या दोन वर्षीय मुलाचं नाव आहे.


पाथर्डी तालुक्यातील ऊसतोडणी कामगार सध्या सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याकडे कामाला आले आहेत. कोर्‍हाळे बुद्रुकजवळ एका ठिकाणी सध्या ते राहत होते. सोमवारी (दि. 14) सायंकाळच्या सुमारास ऊसतोडणी कामगाराचा दोन वर्षीय मुलगा युवराज राठोड हा कोपीसमोर खेळत असताना भटक्या कुत्र्यांनी त्याच्यावर जोरदार हल्ला केला. या घटनेत युवराज या बालकाचा पूर्ण जबडा, ओठ कुत्र्यांनी फाडून काढले. याच मोठा रक्तस्राव झाला. हे सगळं पाहून पालक घाबरले आणि त्यांनी त्याला रुग्णालयात दाखल केलं.


डॉक्टरांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत तत्काळ उपचाराला सुरुवात केली. युवराज राठोड याच्या वडिलांकडे  उपचारांसाठी पैसे नव्हते. त्यामुळे डॉक्टरांनी सामाजिक बांधिलकी जपत  स्वःखर्चातून लगेच औषधे आणि बाकी वस्तू आणल्या. तसंच तत्काळ शस्त्रक्रियेचा निर्णयही घेतला. या शस्त्रक्रियेसाठी मोठा खर्च येणार होता. मात्र पालक उसतोडणी कामगार असल्याने पैसे नव्हते. परिस्थिती पाहता डॉक्टरांनी सगळे उपचार केले. रात्री सगळी तयारी करत त्याची शस्त्रक्रिया केली


तोडणी कामगारांच्या मुलांकडे लक्ष देण्याची गरज
दुसर्‍या एका घटनेत इंदापूर तालुक्यातील कौठळी येथे ऊसतोडणीचे काम करणार्‍या एका तोडणी कामगाराचा मुलगा मुलाला विषबाधा झाल्याची घटना घडली होती. रात्रीच्या वेळी मुलगा निपचित पडला होता. त्याच्याकडून कोणतीही हालचाल होत नव्हती. स्थानिक दवाखान्याने त्याला बारामतीत हलवण्यासाठी सांगितलं. सुदैवाने लवकर उपचार मिळाल्याने त्या मुलाचा जीव वाचला. शेतात फेकून दिलेल्या एखाद्या किटकनाशकाच्या बाटलीमुळे विषबाधा झाली असावी, असा अंदाज डॉक्टरांनी वर्तवला आहे.


पिसाळलेल्या कुत्र्याचा 22 जणांवर हल्ला
पुणे जिल्ह्यातील दौंडमध्ये पिसाळलेल्या कुत्र्याने तब्बल 20 ते 22 जणांना चावा घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. या कुत्र्यांमुळे नागरिक जखमी झाले आहेत. मागील काही दिवसांपासून हा पिसाळलेला कुत्रा दौंड परिसरात फिरत होता. त्यावेळी रस्त्यावरुन ये-जा करणाऱ्या 20 ते 22 जणांना चावा घेतला. या कुत्र्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. अनेक नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.