मुंबई: राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या सर्व घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामध्ये आज राजकीय, सामाजिक, आर्थिक घडामोडींपासून ते खेळ आणि मनोरंजनाच्या बाबतीत अपडेट्स देण्याचा प्रयत्न असतो. आपल्या प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत.


देशात अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिन साजरा, पंतप्रधानांचे देशवासियांना संबोधन
आज देश आपला अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. त्यानिमित्ताने दिल्लीच्या लाल किल्ल्यावर पंतप्रधानांच्या हस्ते ध्वजवंदन होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सलग नवव्यांदा देशाला संबोधन करणार आहेत. 


अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी आज विविध कार्यक्रमांची घोषणा करण्याची शक्यता आहे. या स्वातंत्र्यदिनानिमित्त सरकारने ‘हर घर तिरंगा’ या उपक्रमाची घोषणा केली असून देशवासियांचा त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे पहिल्यांदाच स्वदेशी तोफेच्या सहाय्याने 21 तोफांची सलामी देण्यात येणार आहे. 


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आज सकाळी 7.18 मिनीटांनी आगमन होणार आहे. त्या आधी ते राजघाटवर जाऊन त्या ठिकाणी महात्मा गांधींच्या समाधीचे दर्शन घेणार आहेत. लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लष्कराच्या तीनही दलांकडून गार्ड ऑफ ऑनर देण्यात येणार आहे. 


सकाळी 7.30 वाजता लाल किल्ल्यावर पंतप्रधानांच्या हस्ते ध्वजवंदन होणार असून त्यानंतर ते देशवासियांना संबोधन करणार आहेत. 


मुख्यमंत्री वर्षा या शासकीय निवासस्थानी ध्वजवंदन करणार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहण समारंभास उपस्थित राहतील. त्यांच्या हस्ते वर्षा या शासकीय निवासस्थानी सकाळी 8.15 वाजता ध्वजवंदनाचा कार्यक्रम होणार आहे.  त्यानंतर ते  9.15 वाजता मंत्रालयात ध्वजरोहणासाठी उपस्थित राहतील. 


स्वातंत्र्यदिनानिमित्त देशभर उत्साह
देशात आज अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात येत असून त्यानिमित्ताने देशभर उत्साह आहे. राज्यातील त्या-त्या राजधानीच्या ठिकाणी संबंधित मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजवंदन पार पडणार आहे. तर देशाच्या विविध ठिकाणी आज विद्यार्थी आणि तरुणांकडून प्रभात फेरीचे आयोजन करण्यात येत आहे. तसेच आज दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं आहे. 


विनायक मेटे यांच्यावर आज अंत्यसंस्कार
शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यूनंतर बीड शहरावर शोककाळा पसरली आहे. मेटे यांचं पार्थिव मुंबईवरून बीड शहरामध्ये काल रात्री आणण्यात आलं आहे. त्यानंतर ते बीड शहरातील शिवसंग्राम कार्यालयासमोर अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं. अंत्यदर्शन झाल्यानंतर विनायक मेटे यांची अंत्ययात्रा अण्णाभाऊ साठे चौक मार्गे जालना रोडकडून डीपी रोडवर असणाऱ्या विनायक मेटे यांच्या शेतात येणार आहे. तिथं त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. या ठिकाणी प्रशासनाकडून अंत्यसंस्कारासाठी जोरदार तयारी सध्या सुरू आहे.


दरम्यान, विनायक मेटे यांच्या अंत्यसंस्कारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दुपारी 1 वाजता विमानाने औरंगाबादमध्ये येतील. त्यानंतर कडे रवाना होतील. 3.40 वाजता ते विनायक मेटे यांच्या अंत्यसंस्कारासाठी उपस्थित राहतील.