बारामती: पतीला सांगून घराबाहेर न गेल्याने पतीने पत्नीवर कोयत्याने हल्ला केल्याची घटना आज घडली. या हल्ल्यात पत्नीच्या डाव्या हाताची करंगळी आणि त्याच्या शेजारचे बोट तुटले आहे. ही घटना बारामती एमआयडीसीच्या शेजारच्या रुईमध्ये घडली आहे. दीपाली जाधव असं पीडित पत्नीचे नाव आहे तर सुदर्शन जाधव असं आरोपी पतीचे नाव आहे. 


दीपाली आणि सुदर्शन हे बारामतीत राहून काम करत उपजीविका करतात. 2011 साली त्यांचा प्रेमविवाह झालेला आहे. तेव्हापासून ते बारामतीतच राहतात. न सांगता घराबाहेर गेलेल्या पत्नीवर पतीने कोयत्याने हल्ला केला. यात तिच्या डाव्या हाताची करंगळी आणि त्याच्या शेजारील बोट तुटले. तिच्या डाव्या हाताच्या पोटरीवरही गंभीर दुखापत झाली. जखमी महिलेवर बारामतीच्या खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. याबाबत तालुका पोलिसांनी सुदर्शन रणजित जाधव याच्या विरोधात गंभीर मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. 


जखमी असलेल्या दिपाली सुदर्शन जाधव यांनी याबाबत पोलिसात फिर्याद दिली आहे. मूळचं बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील किणी गावचं असलेले हे दाम्पत्य बारामतीत 2011 पासून वास्तव्यास आहे. 10 ऑगस्ट रोजी फिर्यादी महिला तिच्याकडील दुचाकीवरून पेन्सिल चौकात गेली होती. त्यावेळी तिचा पती कामाला गेला होता. सायंकाळी तो घरी आला असता त्याला पत्नी घरात दिसली नाही. त्याने तिला फोन करत चौकशी केली असता तिने कामानिमित्त बाहेर आल्याचे सांगितले. रात्री पावणेआठच्या सुमारास ती घरी गेली असता पतीने तिला न सांगता तू घराबाहेर का गेलीस असं म्हणत थोबाडीत मारली. 


मॉलमध्ये सेल लागला असून तेथे मी खरेदीला गेले होते असं उत्तर फिर्यादीने दिले. त्यानंतर पतीने कोयता हातात घेत तिच्या डोक्यावर मारहाण करून तिला जखमी केले. तिच्या हातावर कोयत्याने वार केले. त्यात तिची करंगळी आणि शेजारचे बोट तुटले. पोलिसांकडे गेल्यास जीवे मारण्याची धमकी सुदर्शन जाधवने दीपालीस दिली. त्यामुळे ती भीतीने घराबाहेर पळून गेली. तेथील स्थानिक नागरिकांनी तिला दवाखान्यात दाखल केले. त्यानंतर दिपालीने सुदर्शन विरोधात बारामती तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तालुका पोलिसांनी कलम 326, 3, 324, 504, 506 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.