मुंबई: गुजरात आणि हिमाचल राज्यात सत्ता कुणाची याचा फैसला आज होणार आहे. आज सकाळी 8 वाजल्यापासून या दोन राज्यातील निवडणुकीच्या मतमोजणीला सुरूवात होणार आहे. गुजरातमध्ये भाजप आपली सत्ता कायम ठेवणार तर हिमाचलमध्येही भाजप काठावर पास होणार असा अंदाज एक्झिट पोलच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आला आहे. यासह आज इतर कोणत्या महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत त्या जाणून घेऊया.
गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक मतमोजणी
गुजरातच्या 15 व्या विधानसभेच्या 182 जागांसाठी 1 आणि 5 डिसेंबर असं दोन टप्प्यात मतदान झालं. पहिल्या टप्प्यात 89 जागांवर तर दुसऱ्या टप्प्यात 93 जागांवर मतदान झाले. आज सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणी होणार आहे. एक्झिट पोलमध्ये भाजपला विजय मिळू शकतो असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. गुजरातमध्ये 2017 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला 99 तर कॉग्रेसला 77 जागा मिळाल्या होत्या. तर दोन जागांवर बीटीपी आणि एका जागा राष्ट्रवादी तर तीन जागांवर अपक्ष उमेदवार निवडून आले होते. 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपला 16 जागांवर फटका तर काँग्रेसच्या 16 जागा वाढल्या होत्या. या निवडणुकीत आपनं भाजप आणि काँग्रेसला थेट आव्हान दिल्यानं कोणाची डोखं दुखी वाढणार अशी चर्चा आहे.
हिमाचल प्रदेश विधानसभेच्या 68 जागांसाठी 12 नोव्हेंबरला मतदान झाले. गेल्या 37 वर्षापासून भाजप आणि कॉंग्रेसला अलटून पालटून सत्ता मिळाली आहे. एक्झिट पोलनुसार भाजप सत्तेच्या जवळ असल्याचं सांगितलं जातंय. तरीही दोन्ही पक्षात काटे की टक्कर होईल असा अंदाज आहे.
शरद पवारांनी दिलेला 48 तासांचा अल्टीमेटम आज संपणार? पवार काय करणार?
कन्नड रक्षण वेदिके या संघटनेकडून महाराष्ट्राच्या बसेसवर दगडफेक करण्यात आल्यानंतर राज्यातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. यावर शरद पवारांनी पत्रकार परिषद घेत 24 तासात हल्ले थांबवा अन्यथा पुढच्या 48 तासात माझ्यासह महाराष्ट्रातील सर्व खासदारांना बेळगावच्या नागरिकांना धीर देण्यासाठी जावं लागेल असं वक्तव्य केलं होतं. पवारांच्या या वक्तव्यामुळे गेल्या 24 तासात राष्ट्रवादीकडून राज्यभर पडसाद उमटत होते. पवारांनी दिलेला अल्टिमेटम आज संपणार आहे.
महाविकास आघाडीचे खासदार दिल्लीत अमित शाहंची भेट घेणार
महाराष्ट्र-कर्नाटस सीमावादावर आज मविआचे खासदार केंद्रीय गृहमंत्री अमित शाहंची भेट घेणार आहेत. खासदार सुप्रिया सुळेंनी दिलेल्या माहितीनुसार दुपारी 12.40 मिनिटांनी ही भेट होणार आहे. या शिष्टमंडळात शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसचे खासदार असणार आहेत.
आज पिंपरी बंदची घोषणा
महाराष्ट्रातील सर्व महापुरुषाच्या वारंवार होणाऱ्या अवमानाबद्दल आज पिंपरी चिंचवड शहरांमध्ये बंद पुकरण्यात आला आहे. छत्रपती संभाजीराजे दुपारी 12.30 वाजता पिंपरी चौक येथे उपस्थित रहाणार आहेत.
अनिल देशमुखांच्या जामीन अर्जावर आजही सुनावणी सुरूच
अनिल देशमुखांच्या जामीन अर्जावर आजही हायकोर्टात युक्तिवाद सुरू राहणार आहे. आज दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण होऊन हायकोर्ट आपला निकाल राखून ठेवण्याची शक्यता आहे. सीबीआयचा देशमुखांना जामीन देण्यास जोरदार विरोध आहे.
उद्धव ठाकरे यांच्या मालमत्तेशीची संबंधित याचिकेवर आज सुनावणी
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि कुटुंबियांनी बेहिशेबी मालमत्ता जमवल्याचा आरोप करत हायकोर्टात दाखल याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. सीबीआय आणि ईडी चौकशीची मागणी गौरी भिडे यांनी दाखल केलेल्या याचिकेत करण्यात आली आहे.