Todays 3 December Top Headline : बातमी कधी आणि कशी येईल सांगता येत नाही. अशात काही कार्यक्रम मात्र ठरलेले असतात. आज दिवसभरात काय काय कार्यक्रम आहेत. याबाबत आम्ही आपल्याला या बातमीतून माहिती देत आहोत. आज तीन डिसेंबर रोजी राज्य सरकारने महारोजगार मेळाव्याचं आयोजन केलेय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्याशिवाय महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी..महापुरुषांच्या सन्मानासाठी रोहित पवार आत्मक्लेश आंदोलन करणार आहेत. त्याशिवाय अनेक महत्वाच्या घडामोडी आज दिवसभरात घडणार आहे. वाचा आज दिवसभरातील काही महत्वाच्या घडामोडींबद्दल...त्या
उदयनराजे आज रायगडावर, काय भूमिका घेणार?
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्यानंतर उदयनराजे आक्रमक झाले आहेत. त्या पार्श्वभूवर उदयनराजेंनी शिवसन्मानाचा निर्धार केला. आज ते रायगडावर येणार आहेत. शिरकाई, जगदिश्वर मंदिराला अभिवादन केल्यानंतर उदयनराजे शिवभक्तांना संबोधित करणार आहेत. उदयनराजे आज नेमकं काय बोलणार? याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.
महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी..महापुरुषांच्या सन्मानासाठी रोहित पवार करणार आत्मक्लेश-
वढू- बुद्रुक येथे संबाजी महाराजांच्या समाधीस्थळी रोहित पवार आज आत्मक्लेश करणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वारंवार आक्षेपार्ह विधानं केली जात असल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन केलं जाणार आहे.
राज ठाकरे रत्नागिरी दौऱ्यावर -
आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. रिफायनरी विरोधक आणि समर्थक राज ठाकरेंना भेटण्याची शक्यता आहे. सकाळी 11 वाजता राज ठाकरेंच्या हस्ते राजापूर येथे पक्ष कार्यालयाचं उद्घाटन होणार आहे. त्यानंतर राजापूर विधानसभा पदाधिकाऱ्यांची बैठक आणि 200 महिलांचा पक्षप्रवेश होणार आहे. गटबाजी आणि कार्यकर्त्यांमधील समन्वयाचा अभाव पाहता राज ठाकरे यांनी सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारणी बरखास्त करण्याचा घेतला निर्णय. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातल्या राज ठाकरे यांच्या निर्णयाकडे असणार लक्ष.
सिनेट निवडणुकीत उडणार धुरळा !!
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर पहिल्या ठाकरे गट सिनेटच्या निवडणूकीच्या तयारीला लागलं आहे. या निवडणुकीत आदित्य ठाकरेंनी गतवर्षी 10 पैकी 10 जागा जिंकल्या होत्या. यंदादेखील निवडणूक जिंकण्यासाठी ठाकरेंनी तयारी केली आहे. पण या निवडणुकीत आदित्य ठाकरेंची शिंदे गट, मनसे आणि भाजपशी टक्कर असणार आहे. जानेवारीत ही निवडणूक जाहीर होईल.
अजित पवार यांच्या अडचणी पुन्हा वाढण्याची शक्यता -
मुंबई- महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील हजारो कोटी रुपयांचा घोटाळा केल्याच्या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अडचणी पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. याप्रकरणी पवारांसह एकूण 75 जणांना दोन वर्षांपूर्वी 'क्लीन चीट' देण्यात आली होती. मुंबई पोलीसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी दाखल केलेला सी-समरी रिपोर्ट आधी रद्द करा, मगच नव्यानं तपास सुरू करा अशी मागणी याप्रकरणातील तक्रारदारांनी कोर्टाकडे केली आहे. तक्रारदार माणिकराव जाधव यांच्यावतीनं तसा रितसर अर्जच कोर्टात सादर करण्यात आला असून शालिनीताई पाटील, जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यावतीनंही आज कोर्टात तसे अर्ज करण्यात येणार आहेत.
पाणी संघर्ष कृती समितीचा अल्टिमेटम आज संपणार -
सांगली- कर्नाटकमध्ये जाण्याचा पाणी संघर्ष कृती समितीचा 8 दिवसांचा अल्टिमेटम आज संपणार आहे. रविवारी संध्याकाळी जतच्या उमदी या ठिकाणी पाणी संघर्ष कृती समितीची व्यापक बैठक होणार आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यानंतर महाराष्ट्र सरकार काय भूमिका घेणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलेय.
महारोजगार मेळाव्याचे आयोजन -
राज्य सरकारच्या वतीने पंडित दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. एकीकडे राज्यातील उद्योग बाहेर जात असल्याची टीका होत असताना आताही टीका पुसून काढण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने रोजगार मेळाव्याच्या संधी उपलब्ध करून दिल्या जात आहेत. या मेळाव्यात विविध नामांकित कंपन्यांमधील सात हजार रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. एलफिन्स्टन टेक्नीकल हायस्कूल, फोर्ट येथे हा रोजगार मेळावा होणार आहे.
नौदल कमांडची वार्षिक पत्रकार परिषद -
भारतीय पश्चिम नौदल कमांडची वार्षिक पत्रकार परिषद आयएनएस चेन्नईवर युद्धनौकेवर पार पडणार आहे..या पत्रकार परिषदेला व्हाइस अडमिरल अजय बहादूर सिंह हे संबोधित करतील. वर्षभरात पश्चिम नौदल कमांडने केलेली काम आणि भविष्यात समोर असलेली आव्हाने, युद्धनौकेचे कमिशनिंग, प्रोजेक्टस याबद्दल माहिती दिली जाईल.
जी-20 परिषदेची तयारी -
मुंबई- जी-20 परिषदेची महाराष्ट्रातील पहिली बैठक मुंबईत १२ ते १५ डिसेंबरला होणार आहे. दरम्यान या काळात परिषदेच्या निमित्ताने विविध देशांचे प्रतिनिधी मंडळ, मुंबई शहरात वास्तव्यास असून वांद्रे जिओ केंद्रं येथे बैठकीला उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे मुंबईत या निमित्तानं कामं सुरू आहेत. याचा महानगरपालिका सहआयुक्त आणि अधिकारी वांद्रे परीसरात कामाचा आढावा घेणार आहेत, दुपारी २ वाजता - अल्पेश
पुण्यात डॉग शो -
पुणे- ३ आणि ४ डिसेंबर रोजी पुण्यात डॉग शो होणार आहे. इंटरनॅशनल जुरी श्री. हितोशी सायमा (जपान) आणि श्री. पीटर फिरिक (सर्बिया) उपस्थित रहाणार आहेत. पोलीस मैदान, शिवाजीनगर येथे डॉग शो होणार आहे.
एम रामकुमार यांचा जनता दरबार -
जळगाव- सर्वसामान्य जनतेला पोलीस ठाण्यात येणाऱ्या अडचणी तत्काळ सोडविता याव्यात आणि त्यांचा वेळीच निपटारा व्हावा यासाठी नुकताच पदभार घेतलेल्या पोलीस अधीक्षक एम रामकुमार यांनी जनता दरबाराचं आयोजन केले आहे. जनतेच्या समस्या एकून घेत तत्काळ सोडविण्याचा पोलीस दलाचा जिल्ह्यात नव्यानेच प्रयोग केला जाणार आहेत.
आरोग्यमंत्री मेळघाट दौ-यावर -
अमरावती- राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. तानाजी सावंत २ आणि ३ डिसेंबरला मेळघाट दौ-यावर असून ते धारणी आणि चिखलदरा तालुक्यातील आरोग्य यंत्रणेची पाहणी करणार आहेत.
बुलढाणा- जिल्ह्यातील आदिवासी बहुल भागात रुग्णांच्या सेवेसाठी सुरू करण्यात येणाऱ्या डॉ.हेडगेवार रुग्ण साहित्यसेवा केंद्राच्या बुलढाणा अर्बनचे अध्यक्ष राध्येशाम चांडक यांच्या हस्ते उदघाटन होणार आहे. संग्रामपूर व जळगाव जामोद तालुक्यातील आदिवासी रुग्णांना या वैद्यकीय साहित्य जसे ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर, आयसीयू बेड, रुग्णवाहिका इत्यादी साहित्याचं लोकार्पण करण्यात येणार आहे, दुपारी १२ वाजता.
दुसऱ्या टप्प्यातील प्रचार आज संपणार
गुजरात विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीचा प्रचार आज संपणार आहे. दुसऱ्या टप्प्यात पाच डिसेंबर रोजी 93 जागांसाठी मतदान होणार आहे. गुजरात विधानसभेसाठी पहिल्या टप्प्यातील 19 जिल्ह्यातील 89 विधानसभा मतदारसंघासाठी 56.88 टक्के मतदान झालं.