पालघर : जिल्ह्यातील दहिसर वनपरिक्षेत्राच्या साखरे गावच्या हद्दीत वाघोबाचे दर्शन झाले आहे. वरई पारगाव रस्त्यालगत असणाऱ्या वांद्री धरणाच्या कालव्याच्या रस्त्यावर सोमवारी रात्री सात वाजताच्या सुमारास पट्टेरी वाघ दिसून आल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रत्यक्ष दर्शींने दिलेल्या माहितीनुसार कालव्याच्या रस्त्यावर वाघाच्या पंज्याचे ठसे आढळून आले आहेत. पट्टेरी वाघाचा वावर रहिवासी भागात आढळून आल्याने मनुष्यहानी होण्याआधी वाघाचा ठावठिकाणा शोधून त्याला योग्य ठिकाणी सोडण्याची मागणी गावकऱ्यांकडून केली जात आहे.
साखरे गावचा रहिवासी विकास पानेरा सोमवारी रात्री सात वाजताच्या सुमारास दुचाकीवरून दूध विक्रीसाठी गेला होता. घराकडे परतत असताना नावझे बस स्टॉप शेजारील त्याच्या घरच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यालगतच्या वांद्री धरणाच्या कालव्याच्या रस्त्यावर पट्टेरी वाघ दुचाकीच्या हेडलाईटच्या उजेडात साखऱ्याच्या दिशेने जात असताना त्याला दिसून आला. वाघ पाहिल्याने विकास चांगलाच घाबरला. कसा बसा घरी पोहोचल्या नंतर वाघाची माहिती त्याने ग्रामस्थांना दिली. साखरे गावच्या ग्रामस्थांनी वांद्री कालव्याच्या रस्त्यावर जाऊन वाघ दिसतो का? याची पाहणी केली. दरम्यान कालव्याच्या मातीच्या रस्त्यावर वाघाच्या पंज्याचे ठसे आढळून आल्याची माहिती जयवंत पाटील यांनी दिली. रहिवासी भागात पट्टेरी वाघाचा वावर असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाघाचा ठावठिकाणा शोधून त्याला जेरबंद करण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. दरम्यान पट्टेरी वाघाचा वावर असल्याने वनविभागाकडून केल्या जाणाऱ्या उपाययोजनांबाबत माहिती जाणून घेण्यासाठी दहिसर वनपरिक्षेत्र अधिकारी नम्रता हिरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी उत्तर दिले नाही.
हे ही वाचा-
- वाघ बघायचाय.. 'या' जंगलांचा आहे पर्याय?
- चंद्रपूरच्या भटाळी गावात वाघ आणि गावकरी आमनेसामने, थरार कॅमेऱ्यात कैद
- मानव-वन्यजीव संघर्ष टाळायचा असेल तर वाघांचं संवर्धन अत्यावश्यक
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha