Gondia News गोंदिया : नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव प्रकल्पात (Navegaon Nagzira Tiger Reserve) सलग दुसऱ्या दिवशी आणखी एका वाघाचा मृतदेह आढळल्याने नागझिरा प्रशासन हादरले आहे. नागझिराचा राजा अशी ओळख असणारा 'टी-9' या वाघाचा दुसऱ्या वाघासोबत झालेल्या झुंजीत मृत्यू (Tiger Death) झाल्याचे काल, रविवार उघडकीस आले असताना आज, (दि.23) कक्ष क्रमांक  99 मध्ये सकाळी 'टि-4' या वाघिणीचा छावा मृतावस्थेत सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. तर या वाघाचा मृत्यूही झुंजीत झाल्याचा अंदाज आहे. दरम्यान, वर्चस्वाच्या झुंजीत दोन दिवसात दोन वाघांचा मृत्यू झाल्याने नागझिऱ्याच्या जंगलात आता वाघांचा रक्तरंजित खेळ सुरू झाल्याचे दिसून येत आहे.


नागझिऱ्याच्या जंगलात वाघांचा रक्तरंजित खेळ 


नागझिरा अभयारण्यांतर्गत सहवनक्षेत्र नागझिरा संकुल, नियत क्षेत्र नागझिरा 1, कक्ष क्र.96 मधील मंगेझरी रोड नागदेव पहाडी परिसरात बिटरक्षक गस्तीवर असतांना साधारणतः सकाळी दहा वाजताच्या सुमारास टी-9 ऊर्फ 'बाजीरावʼ मृत अवस्थेत दिसून आला होता. दरम्यान, राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या प्रमाणभूत कार्यपध्दतीनुसार गठीत समितीद्वारे घटनास्थळ परिसराची पाहणी करून टी-9 वाघाची उत्तरीय तपासणीनंतर अंत्यसंस्कार करण्यात आले होते.  त्यातच आज, कालच्या घटनास्थळापासून काही अंतरावरच कक्ष क्रमांक 99 मध्ये टी-9 च्या कुटुंबातीलच टी-4 वाघिणीच्या छाव्याचा मृतदेह आढळून आला आहे.


घटनेतील वाघाचा मृत्यू दोन ते तीन दिवसांपूर्वीच झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत असून घटनेची माहिती मिळताच नवेगाव-नागझिरा क्षेत्रसंचालक तथा उपवनसंरक्षक जयरामे गौडा, उपसंचालक राहूल गवई, सहाय्यक वनसंरक्षक एम.एस. चव्हाण यांच्यासह त्यांची चमू घटनास्थळी दाखल झाली आहे. तर पथकातर्फे कारवाईला सुरूवात करण्यात आली आहे. दरम्यान, या वाघाचा मृत्यूदेखील वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी दुसर्‍या वाघासोबत झालेल्या झुंजीत झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.


कशी असते वर्चस्वाची लढाई


जाणकारांच्या मते नवीन वाघ एखाद्या जंगलात प्रवेश करतो तेव्हा त्या जंगलात वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी तेथील स्थायी प्रमुख वाघासोबत लढाई करून त्याला ठार करतो. तर त्यानंतर त्या वाघाच्या छाव्यांनाही ठार करून आपले वर्चस्व प्रस्थापित करतो, अशी समज आहे. तेव्हा काल, टी-9 वाघ तर आज, त्याच्या छाव्याचा मृतदेह आढळून आल्याने नागझिऱ्याच्या जंगलात नवीन वाघाने एंट्री केली असून वर्चस्वासाठी वाघांचा रक्तरंजित खेळ सुरू झाल्याचे दिसून येत आहे. 


कोण होता टी-9?


'टी-9' उर्फ 'बाजीराव' वयाच्या बाराव्या वर्षी वर्चस्वाच्या लढाईत मरण पावला. बाजीराव हा मूळ ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाच्या कोळसा वन परीक्षेत्रातील वाघ होता. डिसेंबर-2016 मध्ये हा वाघ ताडोबावरून वाघांच्या नियमित नैसर्गिक भ्रमण मार्गाने नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या नागझिरा जंगलात स्थलांतर करून आला होता. तब्बल नऊ वर्ष त्याने या जंगलावर आपले अधिराज्य गाजवले. मात्र, काल, त्याचा तर आज त्याच्या छाव्याचा दुसऱ्या नर वाघासोबत झालेल्या झुंजीत मृत्यू होऊन वर्चस्व संपला आहे. 


हे ही वाचा