सातारा :  महाबळेश्वरमध्ये एक तीन वर्षांचे बाळ 50 फूट खोल विहिरीत पडले. तब्बल तीन तासानंतर या बाळाला सुखरूप बाहेर काढण्यात आले. आयान शेख असे या बाळाचे नाव आहे.

खेळता खेळता आयान 50 फूट विहिरीमध्ये पडला होता. नशिब बलवत्तर म्हणून आयान बचावला. महाबळेश्वर ट्रेकर्सच्या कार्यकर्त्यांनी त्याला बाहेर काढले. आयान विहिरीत पडल्यानंतर तीन तासांनी लक्षात आला. तो तीन तास विहिरीतच होता.


आयान हा पर्यटक म्हणून महाबळेश्वरात आलेल्या मदरशाच्या मुलांसोबत आला होता. तो विहिरीत तब्बल तीन तास राहुनही  सुखरूप बचावल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या बाळाला महाबळेश्वर ट्रेकर्स कार्यकर्त्यांनी सुखरूप बाहेर काढून रूग्णालयात पोचवले.

आयान शेख हा मुंबई सायन येथील आहे.  तो मदरशाच्या मुलांसोबत महाबळेश्वर येथे आला होता. हा लहान असल्यामुळे त्याची आईही सोबत होती. संध्याकाळी आयान सर्व मुलांसोबत खेळत असताना अचानक गायब झाला. तीन तास शोध सुरू असताना जवळच्या विहिरीत पाहिले असता त्याचा आवाज आला.

पोलिसांना या घटनेची माहिती दिली गेली. त्यानंतर पोलिसांनी महाबळेश्वर ट्रेकर्सच्या जवानांना बोलावले, शर्तिच्या प्रयत्ना नंतर आयनला बाहेर काढण्यात आले. शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. आयानच्या डोक्याला तीन टाके पडले असून तो आता सुखरूप असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. आयान 50 फूट खोल विहिरीत पडूनही सुखरूप असल्यामुळे आश्चर्य  व्यक्त केलं जात आहे.