नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संघ शिक्षा तृतीय वर्ष वर्ग समारोपाच्या कार्यक्रमाला यंदा टाटा समूहाचे अध्यक्ष आणि  प्रख्यात उद्योगपती रतन टाटा हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहण्याची शक्यता आहे, त्यांना संघाकडून निमंत्रण देण्याची सूत्रांची माहिती आहे.

16 जून रोजी नागपुरात रेशीमबाग मैदानावर हे कार्यक्रम होणार असल्याची माहिती आहे.

विशेष म्हणजे मागील वर्षी याच संघ शिक्षा वर्गाच्या समारोपाला माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहिले होते.

संघ शिक्षा तृतीय वर्षाच्या प्रशिक्षण वर्गाला संघात अतिशय महत्त्वाचे मानले जाते. यंदा नागपुरात 23 मे पासून वर्गाला सुरुवात झाली असून या वर्गात देशभरातून 828 तरुण स्वयंसेवक सहभागी झाले आहेत. या प्रशिक्षण वर्गाचा समारोप रेशीमबाग मैदानावर 16 जून रोजी सायंकाळी 6.30 वाजता होणार आहे. याच प्रसंगी मुख्य अतिथी म्हणून रतन टाटा यांना आमंत्रित करण्यात आल्याची माहिती आहे.

विशेष म्हणजे मागील वर्षी याच संघ शिक्षा वर्गाच्या समारोपाला माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहिले होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी वैचारिक मतभेद असल्याने मुखर्जींनी या कार्यक्रमात सहभागी होऊ नये असे काँग्रेसचे म्हणणे होते. मात्र मुखर्जी यांनी ठामपणे हे आमंत्रण स्वीकारले होते.  प्रणव मुखर्जी यांची मुलगी आणि काँग्रेस नेत्या शर्मिष्ठा मुखर्जी यांनी आपल्या वडिलांना आरएसएसच्या कार्यक्रमात सहभागी होण्याबाबत सल्ला दिला होता.

प्रणव मुखर्जी हे ज्ञानी आणि आदरणीय व्यक्तिमत्त्व आहे. विचारांचे आदानप्रदान व्हावे म्हणून मुखर्जी यांना निमंत्रण दिले असल्याचे आरएसएसकडून सांगण्यात आले होते. यावरुन बरंच वादंग उठलं होतं.

राष्ट्रवाद हा कोणत्याही भाषा, रंग, जात, धर्माशी संबंधित नसतो. तसेच असहिष्णुतेमुळे देशाची ओळख धूसर होऊ लागते. देशाप्रति प्रत्येकाने सच्ची निष्ठा बाळगणे हीच खरी देशभक्ती आहे, अशी भावना प्रणव मुखर्जी यांनी या कार्यक्रमात बोलताना व्यक्त केली होती.