शिर्डी : काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांनी भाजपात जाण्याचे संकेत दिले आहेत. राधाकृष्ण विखे पाटील जो निर्णय घेतील त्या निर्णयासोबत आपण राहणार असल्याचं अब्दुल सत्तार यांनी स्पष्ट केलं आहे. अब्दुल सत्तार आज काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेर गावात आले होते, तेथे त्यांनी हे वक्तव्य केलं. तसेच राधाकृष्ण विखे पाटलांना भाजपकडून लवकरच मंत्रीपद दिले जाणार असल्याचे सत्तार यांनी सांगितले.


काँग्रेसला एकामागून एक धक्के बसताना दिसत आहेत. लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर आता काँग्रेसमधून आऊटगोईंगला सुरुवात झाली आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुलगा सुजय विखे पाटील यांना निवडून आणण्याकरिता अहमदनगरमध्ये भारतीय जनता पार्टीचा उघड उघड प्रचार केला. लवकरच ते भाजपात प्रवेश करणार असल्याचं जवळपास स्पष्ट झालं आहे.


राधाकृष्ण विखे पाटील यांना लवकरच मंत्रिपद मिळणार, काँग्रेसचे बंडखोर आमदार अब्दुल सत्तारांचा गौप्यस्फोट | ABP Majha



राधाकृष्ण विखे पाटील यांचे समर्थक अब्दुल सत्तार यांनीही आपण राधाकृष्ण विखे पाटील जो निर्णय घेतील त्या सोबत राहणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. विशेष म्हणजे अब्दुल सत्तार आज बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेर गावात एका खाजगी कार्यक्रमासाठी आले होते. राधाकृष्ण विखे पाटीलही त्यांच्यासोबत उपस्थित होते. त्यामुळे राज्यात काँग्रेसची चिंता वाढली आहे.


येत्या काही महिन्यात विधानसभेची निवडणूक आहे. देशात लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या अपयशामुळे काँग्रेसच्या नेत्यांमध्ये चिंता वाढली आहे. अब्दुल सत्तार काँग्रेस सोडून गेले तर काँग्रेससाठी मोठा धक्का असेल. यापेक्षा निराशाजनक कामगिरीनंतर काँग्रेसला राज्यात गळती तर लोकसभेपाठोपाठ विधानसभेची निवडणूक देखील पक्षाला जड जाण्याची शक्यता आहे.