सातारा : नेहरू विज्ञान केंद्रात भरवण्यात आलेल्या नवप्रवर्तन उत्सव, इनोव्हेशन फेस्टिवलमध्ये साताऱ्यातील 3 रँचोचा बोलबाला पाहायला मिळाला. या महोत्सवात राज्यातील विविध प्रयोग सहभागी झाले असले तरीही सातारच्या तीन बाल शास्त्रज्ञांचे तीन प्रयोग आपली वेगळी छाप पाडत आहेत. राज्यातील बाल शास्त्रज्ञांच्या प्रयोगाला प्रोत्साहन मिळावं या उद्देशानं मुंबईतील नेहरू विज्ञान केंद्रामध्ये इनोवेशन फेस्टिवलचे आयोजन करण्यात आलेलं आहे. दिनांक पाच, सहा आणि सात मार्च या कालावधीमध्ये या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं असून या महोत्सवात संपूर्ण राज्यातील विविध जिल्ह्यातील बाल शास्त्रज्ञांनी आपल्या कल्पनेतून साकारलेले प्रयोग सादर केले. या प्रयोगांमध्ये सातारच्या तीन बाल शास्त्रज्ञांचे प्रयोग हलकेफुलके, सहज आणि सर्वांना हवेहवेसे वाटणारे ठरताहेत.
अंध व्यक्तींसाठी श्रेयश बुवा याने एक 'अल्ट्रा शुज' बनवलेले आहे. अंध व्यक्तीला रस्त्यावरून चालत असताना नेहमी अडथळे येतील की काय अशी भीती वाटत असते. त्यामुळे तो रस्त्यांवरून सहज चालू शकत नाही. त्यामुळे अंध व्यक्तीने जर हा अल्ट्रा शुज घातला, तर त्याच्या समोर येणाऱ्या प्रत्येक अडथळ्यावेळी हा शूज व्हायब्रेट होतो आणि याची कल्पना तो अंध व्यक्तीला देतो. त्यामुळे चालत असताना तो सावध होतो. या शुजमुळं अंध व्यक्तींना अडथळ्याची पूर्वसूचना मिळते. याच बरोबर अंध व्यक्तींसाठी त्याने 'अल्ट्रा स्पेक्ट' अर्थात चष्मा तयार केलेला आहे. हा चष्मा घालून अंध व्यक्ती रस्त्यावर चालू लागला, तर त्याच्या समोर येणारे अडथळे आल्यानंतर या चष्माचे गजर वाजु लागतात. त्यामुळे समोर येणारे सर्व अडथळे अंध व्यक्तीला समजण्यास मदत होते. अशा दोन अफलातून गोष्टी या साताऱ्यात बाल शास्त्रज्ञाने बनवलेल्या आहेत.



21 व्या शतकातील विज्ञान शिक्षकांसमोरील आव्हाने’ या विषयावर शिक्षकांना धडे

मातीविना पाईप शेती

सातारच्या किरण कावळे या पठ्ठ्यानं तर 'मातीविना पाईप शेती' करण्याचं तंत्रज्ञान समोर आणलं आहे. सामान्य माणसाला भाजीपाला आणि घरगुती शेती करण्यासाठी अत्यंत कमी जागेमध्ये हे तंत्रज्ञान उपलब्ध होऊ शकते. या प्रयोगामध्ये शेती करण्यासाठी मातीची गरज नसून मातीच्या ऐवजी यांनी कोकोबीट अर्थात नारळाच्या शेंडीचा, सालीचा भुसा आणि कुजलेले कडधान्य हे एकत्रित करून त्याचा वापर केला जातो. तसेच पाइपला झीक झॅक पद्धतीने छिद्र पाडून त्यामध्ये ठिबक सिंचनाचा वापर करून आपणाला दररोज लागणारा भाजीपाला यामध्ये आपण पिकवू शकतो. अशा पद्धतीची योजना करण्यात आलेली आहे. अत्यंत कमी जागेत, कमी खर्चात कोणीही हे तंत्रज्ञान वापरून संपूर्ण सहा महिन्याची भाजी यामध्ये पिकवू शकतो, असं तंत्रज्ञान या बाल शास्त्रज्ञाने मांडलेलं आहे. या प्रयोगाची राष्ट्रीय स्तरावरही निवड करण्यात आलेली आहे.



स्मार्ट  डस्टबिन 

माहीर मुल्लानी या तिसऱ्या रँचोने तर आपल्या घरात दररोज ज्याचा वापर होतो, त्या डस्टबिनला 'स्मार्ट डस्टबिन' केलेलं आहे. हे डस्टबिन आटोमॅटिक उघडतो आणि बंद ही होतं. ओल्या कचऱ्याची दुर्गंधी बाहेर पसरू देत नाही. या डस्टबिनमध्ये आपण किती कचरा टाकलेला आहे याची माहितीही आपल्या फोनवर देते. तसंच या डस्टबिनला आपण आज्ञा केली, तर ते स्वतःही चालू शकते. अर्थात ते स्वयंचलित आहे. असं हे अफलातून स्मार्ट डस्टबिन या रँचोने तयार केलेले आहे. राज्यभरातील बाल शास्त्रज्ञांच्या कल्पनांना वाव मिळावा, त्या प्रत्यक्षात उतरवण्यासाठीच इनोव्हेशन फेस्टिवलचे आयोजन केले आहे. या फेस्टिवलमध्ये राज्यातील इतर बाल शास्त्रज्ञांनीही सहभाग नोंदविला आहे. हे इनोव्हेशन फेस्टिवल राज्यातील प्रत्येक मुलाने पाहावं असंच आहे.



EXPLAINER VIDEO | National Science Day | रामन इफेक्टचा आपल्याशी काय संबंध? | ABP Majha