मुंबई : ‘अवाढव्य ब्रम्हांडात राहूनही मनुष्याने ज्ञान मिळवल्यामुळे त्याची ‘वैज्ञानिक’दृष्ट्या विचार करण्याची बुद्धी प्रगत झाली आणि त्यामुळे तंत्रज्ञानाचेही आकलन करता आले. मात्र सध्या ते आपल्या पाल्यांपर्यंत पोहचू न देता, त्यांच्यावर पुस्तकी ज्ञानाचे संस्कार का करता, यामुळे देशाची प्रगती कशी होणार, असा प्रश आज भाभा आटोमिक अणूसंशोधन केंद्रातील (बीएआरसी) संशोधक आणि वैज्ञानिक अधिकारी डॉ संतोष टकले यांनी शिक्षकांना केला.
राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून मुंबईत विद्या प्राधिकरणाने गुरुनानक खालसा महाविद्यालयाच्या सहयोगाने ‘21 व्या शतकातील विज्ञान शिक्षकांसमोरील आव्हाने’ या कार्यक्रमाचे माटुंगा येथील गुरुनानक खालसा महाविद्यालयात आयोजन केले होते. मुंबई प्रादेशिक विद्या प्राधिकरण विज्ञान विषयाच्या सहाय्यक व समन्वयक नम्रता परब यांनी या कार्यक्रमाचे आयोजन संघमित्रा त्रिभुवन, उपसंचालक व मनीषा पवार जेष्ठ अधिव्याख्याता यांच्या मार्गदर्शनाखाली केले होते. मुंबई महापालिकेच्या शिक्षण समितीच्या अध्यक्षा अंजली नाईक,बृहन्मुंबई पालिकेचे शिक्षणाधिकारी महेश पालकर खालसा महाविद्यालयाचे प्राचार्य किरण माणगावकर,संगीता माने प्रशासन अधिकारी, प्राधिकरणाच्या बालशिक्षण विभागाचे प्रमुख निबांजी गिते, विनोद घोरपडे, वैशाली काकडे, प्रवीण पाटील, मानसी भोसले, श्रीकांत शिनगारे, शिंदे, खालसा महाविद्यालयाच्या प्रोफेसर देवयानी आवडे, कोल्हे, आजगावकर हेही यावेळी उपस्थित होते.
या वेळी संशोधक संतोष टकले यांनी याप्रसंगी एक तासाच्या अवधीत सूर्य, पृथ्वी, गॅलॅक्सी याविषयी वैज्ञानिक माहिती दिली. ‘धर्म हा शारीरिक चिंतनासाठी आहे. मुलांच्या आचरणात सद्विचार आले तर त्यांच्यात चांगूलपणा येईल. याकरीता अध्यात्म आहे. परंतु दुनियेतील विचारधारांवर चालायचे असल्यास आणि बुद्धी ‘तेज ‘करण्याचे
काम विज्ञान आणि विज्ञानाचे शिक्षणच करु शकते. फक्त विज्ञानाचे पाठ न शिकता भूगोल, इतिहास, मराठी, संस्कृत आणि हिंदीही तेवढीच मनापासून शिका. जे वाचाल ते ह्रदयापासून वाचा, असे आवाहन करताना टकले यांनी शिक्षकांमधील ‘पालकांना’ही सल्ला दिला.
मुलांना फक्त शिकवण्याची कृती न करता, त्यात तुम्हीही स्वारस्याने शिकवा, त्यांना प्रेरणा द्या, त्यांना कोचिंग क्लासला पाठवण्याचे ‘कर्तव्य’ पार न पाडता पाल्यांसोबत बसून त्याच्या अभ्यासाकडे लक्ष द्या, एकवेळ टीव्ही पाहिला नाही तरी चालेल, स्वयंपाक केला नाही तरी हरकत नाही. पाल्यांच्या या कृतीमुळे मुलांवर शैक्षणिक संस्कार आपोआप होऊन ते अभ्यासात पारंगत होतात. मुलांना जन्म देणे, त्यांच्यावर संस्कार करुन जीवनात ‘लायक’ संस्कार देऊन चांगला नागरिक बनवणे महत्वाचे आहे, असे ते म्हणाले.
या विद्यान परिषदेत विविध वैज्ञानिक विषयावर विद्यान शिक्षकसोबत चर्चा झाली जेणेकरून भविष्यात विज्ञान शिक्षक म्हणून नेमके काय आत्मसात करून शिकवले गेले पाहिजे याची माहिती या परिषेदेत झाली. परिषदेतं परिसंवाद आयोजित करण्यात आला होता त्यात अनेक प्रश्नांना मान्यवरांनी दिलखुलास उत्तरे दिली व शेवटच्या सत्रात खुली प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित करून विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निंबाजी गिते व वैशाली काकडे यांनी अतिशय उत्कृष्ट केले.