सांगली : इस्लामपूर शहरातील कोरोनाबाधित कंटेन्मेंट झोनमध्ये नगरपालिकेच्याच घंटा गाडीतून दारूच्या बाटल्याची वाहतूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारावरून राष्ट्रवादीचे स्वीकृत नगरसेवक खंडेराव जाधव यांनी थेट मुख्याधिकारी केबिनमध्ये घुसून मुख्याधिकारी प्रज्ञा पवार यांच्या अंगावर खुर्ची घेवून त्यांना मारण्याचा प्रयत्न केला. 'तुझे घराबाहेर निघणे मुश्किल करतो, तुला व तुझ्या कुटुंबाला बघून घेतो' अशी धमकी दिली. मुख्याधिकारी यांच्या केबिनमध्ये पाच ते सात मिनिटे हा प्रकार सुरू होता. या प्रकरणी मुख्याधिकारी पवार यांनी इस्लामपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आणि रात्री उशिरा नगरसेवकवर गुन्हा दाखल झाला. तर जिल्हा पोलीस अधीक्षक, मुख्यमंत्री, गृहमंत्री, पालकमंत्री, महिला आयोगाला त्यांनी घटनेबाबतचे पत्र दिले आहे.
मंगळवारी दुपारी शहरातील कंटेन्मेंट झोनमध्ये नगरपालिकेच्या कचरा वाहतूक करणाऱ्या गाडीमधून दारू वाहतूक होत असल्याबाबत त्या प्रभागाचे नगरसेवक अमित ओसवाल यांनी मुख्याधिकारी यांच्याकडे तक्रार केली होती. ही बाब गंभीर असल्याने आणि पालिकेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होणारी असल्याने संबंधित वाहनावरील ठेकेदारी कर्मचाऱ्यांवर फौजदारी करण्याचे आदेश त्या मुकादमाला दिले होते. या प्रकारानंतर दुपारी दीडच्या सुमारास प्रभारी आरोग्य अधिकारी साहेबराव जाधव यांच्या मोबाईलवर नगरसेवक खंडेराव जाधव यांनी फोन केला. ते वाहन का धरून ठेवले आहे अशी विचारणा केली.
त्यावेळी साहेबराव जाधव यांनी त्या वाहनाबाबत नक्की काय प्रकार घडलाय ते माहीत नसल्याचे त्यांना सांगितले. त्यानंतर त्यांनी अडीचच्या सुमारास मुख्याधिकाऱ्यांना फोन करून आपण नक्की कशासाठी कार्यवाही करत आहात, अशी विचारणा केली. यावेळी पालिकेची प्रतिमा मलीन होत आहे, या प्रकरणात मी कोणत्याही नगरसेवकांचे नाव किंवा चोरटी दारू वाहतूक होत आहे याचा उल्लेख केलेला नाही. या फोन नंतर थोड्याच वेळात नगरसेवक खंडेराव जाधव मुख्याधिकारी यांच्या दालनात आले. चर्चा सुरू असताना त्यांनी 'तुम्हा सर्वांना दाखवतोच, उगाच माझे तोंड खवळू नका' असे बोलल्यावर मुख्याधिकारी 'तुम्ही नक्की कोणाला काय दाखवणार आहात?' असे विचारल्यावर चिडून त्यांनी 'ये बाई तुला मस्ती आली आहे' असे म्हणून अत्यंत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. केबिनमधील खुर्ची उचलून ते मुख्याधिकाऱ्यांच्या अंगावर धावून गेले, त्यांना मारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी अभियंता जमिर मुश्रीफ व साहेबराव जाधव यांनी त्यांना धरून ठेवले. तरीही अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत ते अंगावर धावून जात होते. त्यानंतर 'तुझे घराबाहेर निघणे मुश्किल करतो, तुला बघून घेतो, तुझ्या कुटुंबाला बघून घेतो' अशी धमकी दिली. मुख्याधिकारी यांच्या केबिनमध्ये पाच ते सात मिनिटे हा प्रकार सुरू होता. हा अत्यंत लज्जास्पद व घृणास्पद प्रकार आहे.
मुख्याधिकारी यांनी जिल्हा पोलीस प्रमुखांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, 'नगरपालिकेचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी गेल्या महिन्याभरापासून एकही दिवस सुट्टी न घेता चोवीस तास काम करत आहेत. दिवसभर कोरोनाबाधित एरियात फिरत असल्याने आम्ही घरातही कुटुंबापासून लांब राहून शहराच्या हितासाठी काम करत आहोत. आम्ही सर्वजण नोकरीपेक्षा सामाजिक उत्तरदायित्वच्या भावनेतून राबत असताना खंडेराव जाधव यांच्या कृत्याने माझ्यासह सर्व कर्मचारी भयभीत झाले आहेत. या नगरसेवकाने सर्वांच्या समक्ष मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच मला व माझ्या कुटुंबाला बघून घेतो अशी धमकी दिलेली आहे. या सर्व प्रकारामुळे मी भयभीत झालेली असून नगरसेवक जाधव यांच्या पासून माझ्या जीविताला धोका आहे.'
सदरच्या घंटागाडीतुन दारू वाहतूक होत असलेल्या तक्रारीमुळे जाधव एवढे का चिडले आणि त्यातून घडलेला हा सर्व प्रकार अनाकलनीय आहे. या प्रकरणाशी संबंधित नगरसेवक यांचा संबंध असल्याचा मला संशय आहे. या प्रकाराबाबत जाधव यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करावी, जेणेकरून आपत्कालीन परिस्थितीत काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांचे मनोधैर्य ढासळणार नाही, या आशयाचे पत्र त्यांनी जिल्हा पोलीसप्रमुख, महिला आयोगाच्या अध्यक्ष, मानवी हक्क आयोग, जिल्ह्याचे पालकमंत्री, जिल्हाधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी व नगराध्यक्ष यांना दिले आहे.
इस्लामपुरात मुख्याधिकाऱ्यांना जीवे मारण्याची धमकी, नगरसेवकाविरोधात गुन्हा
कुलदीप माने, एबीपी माझा
Updated at:
29 Apr 2020 04:28 PM (IST)
राष्ट्रवादीचे स्वीकृत नगरसेवक खंडेराव जाधव यांनी थेट मुख्याधिकारी केबिनमध्ये घुसून मुख्याधिकारी प्रज्ञा पवार यांच्या अंगावर खुर्ची घेवून त्यांना मारण्याचा प्रयत्न केला.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -