कोल्हापूर : कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सलग दुसऱ्या वर्षी संकटाचा सामना करावा लागत आहे. गेल्या वर्षी महापुरामुळे आणि यंदा महामारीमुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. गेल्यावर्षी शेतातून माल काढताच आला नाही आणि यंदा कोरोनामुळे शेतातून काढलेला माल मार्केटला जात नाही. त्यामुळे या दोन्ही जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचे पाय आणखी खोलात रुतलेत.
गेल्या वर्षीच्या महाप्रयलामुळे आणि यंदाच्या कोरोना व्हायरस संकटापुढे सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी अक्षरश: गुडघे टेकले आहे. महापुरामुळे उद्ध्वस्त झालेला शेतकरी आता कुठे सावरत होता. तोच पुन्हा कोरोनाचं संकट डोक्यावर येऊन बसलं. पुरातून शेतीमाल मिळाला नाही. तर कोरोनामुळे शेतातला माल मार्केटमध्ये जात नाही. काही शेतीमाल मार्केटमध्ये गेलाच तर त्याला काडीची किंमत मिळत नाही. मग शेतकऱ्यांनी काय करायचं असा प्रश्न उभा राहतो. या दोन्ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उभा करायचं असेल तर सरकारने विशेष पॅकेज जाहीर करण्याची मागणी राजू शेट्टी यांनी केली.
मुंबई, पुणे येथील चाकरमान्यांना गावी पाठवण्याचा निर्णय चार दिवसात : भास्कर जाधव
कोल्हापूर जिल्ह्यात महापुराच्या वेळी 68 हजार हेक्टरवरील पिक वाया गेलं. अंदाजे केवळ शेतीचं पाच हजार कोटींचं नुकसान झालं. तर सांगली जिल्ह्याचं अंदाजे दोन हजार कोटींचं नुकसान झालं. नैसर्गिक आपत्तीवर वरचढ होऊन शेतकरी कामाला लागला. मात्र तोच कोरोनाच्या ड्रॅगनचा जबडा उघडला. त्यामुळे वीजबिल, कोरोनाच्या दरम्यानचे कर्जाचे हप्ते माफ करा आणि शेतकऱ्यांना शेतीमाल सुलभपणे विकता येईल, याची व्यवस्था करा अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली.
दररोज कुठे ना कुठे शेतकऱ्याला आपल्या शेतीमालाची झालेली नासाडी डोळ्याने पाहावी लागते. कधी द्राक्ष, कधी टोमॅटो कधी भाजी पाला उद्ध्वस्त झालेला पाहायला मिळतो. कोरोनामुळे सगळ्यात जास्त फटका राज्यातल्या शेतकऱ्यांना बसला. त्यामुळे शेट्टी यांनी केलेल्या मागणीचा राज्य सरकारनं सकारात्मक विचार करायला हवा.