मालेगाव : कोरोना व्हायरसचा हॉटस्पॉट ठरलेल्या मालेगावमध्ये पोलीस कर्मचारी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता रस्त्यावर उतरुन अहोरात्र सेवा बजावत आहेत. मालेगाव कॅम्प पोलिसातील असाच एक कर्मचारी आपल्या आजारपणाचा बाऊ न करता सध्या रस्त्यावर उतरुन बंदोबस्त करत आपले कर्तव्य पार पाडत आहे. राजेंद्र सोनवणे असं या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव असून त्यांना किडनीचा आजार आहे.


मालेगाव शहरात कोरोनाचा शिरकाव झाला आणि हळूहळू रुग्णांच्या संख्येत वाढ झाली. त्यामुळे शहरात सर्वत्र कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. ठिकठिकाणी नाकाबंदी सुरु झाली आणि जागोजागी पोलिसांचा बंदोबस्त दिसू लागला. मालेगाव कॅम्प पोलीस स्टेशनचे जमादार म्हणून कार्यरत असलेले राजेंद्र सोनवणे यांना किडनीचा विकार आहे. तरीही ते महाराष्ट्र पोलिसांच्या 'सद्ररक्षणाय खलनिग्रहणाय' या ब्रीदवाक्याप्रमाणे आपल्या कर्तव्यात कुठेही कमी पडत नाहीत.



चार वर्षापूर्वी राजेंद्र सोनवणे यांची एक किडनी खराब झाली आणि दुसरी किडनी पस्तीस टक्के काम करत आहे. त्यामुळे या पोलीस कर्मचाऱ्याला आठवड्यातून दोन दिवस रुग्णालयात जाऊन डायलिसिसचे उपचार करावे लागतात. मात्र अशा परिस्थितीतही ते प्रथम आपल्या कर्तव्याला प्राधान्य देत आहेत. वरिष्ठ अधिकारी उपचाराच्या वेळी सहर्काय तर करतातच शिवाय घरातील लोकांचं पाठबळ मिळत असल्याने मी पूर्ण बरा आहे. सकारात्मक विचार करत असल्यामुळेच रस्त्यावर उतरुन बंदोबस्त करत असल्याचं राजेंद्र सोनवणे सांगतात.


एकूणच कोरोनाच्या या काळात आजारपण दूर ठेवत राजेंद्र सोनवणे यांच्यासारखे असंख्य पोलिस कर्मचारी ताणतणाव सहन करुन रस्त्यावर उतरत आपले कर्तव्य पार पाडताना दिसत आहेत.


VIDEO | Beed Police | एक महिन्याच्या बाळाला लांबूनच पाहण्याची वेळ, कर्तव्य निभावणाऱ्या पोलिस बाबाची कहाणी | स्पेशल रिपोर्ट