Omicron And Delta Coronavirus Variant Symptoms : कोरोना महामारीचाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा देशात वाढत असल्याचे दिसत आहे.  फक्त देशातच नाही तर जगभरात कोरोनानं पुन्हा हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. देशात मागील तीन ते चार दिवसांत रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहेत. दोन ते तीन दिवसांतच रुग्ण संख्येचा आकडा दुप्पट होत असल्याचं चित्र आहे. दक्षिण आफ्रिकामध्ये उदयास आलेल्या ओमायक्रॉनमुळे रुग्णाच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याचं काही तज्ज्ञांचे मत आहे. पण कोरोनाचा व्हेरियंट ओळखणं आणि त्याची लक्षणं काय? डेल्टा, ओमायक्रॉनची लक्षणे काय आहेत?  हे प्रश्न डोकेदुखी ठरत आहेत. ओमायक्रॉन व्हेरीयंटच्या कोरोनाची लागण झाली आहे हे कसं ओळखावे? पाहूयात याचसंदर्भातील माहिती...  


कोरोनाचा प्रादुर्भाव सर्व जगभरात सध्या वेगाने पसरत आहे. याचं प्रमुख कारण आहे ओमायक्रॉन व्हेरीयंटच्या कोरोनाचा सर्वत्र होणारा वेगाने फैलाव हा आहे. नागरिकांमध्ये संभ्रम आहे की ह्या व्हेरीयंटची कोणती प्रमुख लक्षणे आहेत? सोबतच कोणत्या व्हेरीयंटच्या कोरोनाची आपल्याला लागण झाली आहे? साध्या सर्दीमध्ये आणि कोरोना असलेली सर्दी कशी ओळखावी?  ग्लोबल हॉस्पिटलचे छाती विकार तज्ज्ञ डॉ. हरीश चाफळे यांनी एबीपी माझाला याबाबतची माहिती दिली आहे. ओमिकॉनमध्ये श्वसनलिकेतील वरच्या भागातील लक्षणेप्रामुख्याने आढळत आहेत तर डेल्टामध्ये दोन्ही भागातली लक्षणे आढळत होती, असे चाफळे यांनी सांगितले.  


कोणत्या व्हेरीयंटची कोणती लक्षणे? 
ओमायक्रॉन आणि डेल्टाच्या लक्षणांमध्ये मोठा फरक नाही. पण मात्र ओमायक्रॉन व्हेरियंटमध्ये ताप असणे, घशात खवखव असणे, कोरडा खोकला, सर्दी आणि अंग दुखणे ही प्रमुख लक्षणे आढळतात. तर डेल्टामध्ये तोंडाची चव बिघडणे, वास न येणे ही देखील लक्षणे होती. 


ओमायक्रॉनचा फैलाव अधिक का?
कोरोनाचे आतापर्यंत तीन प्रमुख व्हेरीयंट बघायला मिळालेत. ज्यामुळे मोठी रुग्णवाढ झाली. ज्यात अल्फा, डेल्टा आणि आताचा ओमायक्रॉन व्हेरियंट आहे. अशातच डेल्टापेक्षा ओमायक्रॉन व्हेरीयंटमध्ये संसर्ग जंतु राहण्याचा वेळ खूप कमी आहे. हा कालावधी थेट २ते ३ दिवसांवर आला आहे. त्यामुळे रुग्णसंख्या झपाटयानं वाढत असल्याची प्रतिक्रिया टास्क फोर्सचे सदस्य डॉ. वसंत नागवेकर यांनी दिली आहे. डेल्टामध्ये इन्क्युबेशन पिरीयट ५ ते ७ दिवस होता. मात्र ओमायक्रॉनमध्ये हा वेळ कमी झाला आहे. त्यामुळे ओमिक्राॉनचा फैलाव वाढला आहे, असे वसंत नागवेकर यांनी सांगितले.  


डेल्टा आणि ओमायक्रॉनमुळे काय झालं? 
डेल्टामध्ये घरातील एक जण पॉझिटिव्ह आला तर घरातील इतर सदस्य पाच ते सहा दिवसानंतर पॉझिटिव्ह आढळण्याचे प्रमाण होतं.  मात्र ओमायक्रॉन व्हेरियंटमुळे 24 तासांत घरातील सर्वजण पॉझिटिव्ह आढळत आहेत. ओमायक्रॉन व्हेरियंटचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होतोय. डेल्टा व्हेरियंटमध्ये पाच ते सहा दिवसानंतर चाचणी करा, असा सल्ला दिला जात होता.  कारण शरीरात संसर्ग जंतु राहण्याचा कालावधी अधिक होता. मात्र, ओमायक्रॉनमुळे आता तो कालावधी कमी झाला आहे. रुग्ण पॉझिटिव्ह होण्याचा कालावधी एक ते दोन दिवसांवर आला आहे.  सोबतच डेल्टामध्ये हायरिस्क कॉन्टॅक्ट कालावधी १० ते १५ मिनिटांचा होता. तो कालावधी आता पाच मिनिटांच्याही खाली आला आहे.  


चार आठवडे काळजीचे -
यापुढील दोन ते चार आठवणे काळजीचे आहेत, उन्हाळ्यापर्यंत रुग्णसंख्या कमी होईल, असा विश्वास टास्क फोर्सचे सदस्य आणि संसर्गजन्य रोग तज्ज्ञ डॉ. वसंत नागवेकर यांनी व्यक्त केलाय. 


मास्क हाच उपाय -
कोव्हिडच्या आजाराची तीव्रता ही लसीकरण न झालेल्यांमध्ये अधिक बघायला मिळते आहे. अशातच सध्याला लसीकरण जरी मोठ्या प्रमाणात होत असले तरी ह्यावर दुसरा प्रमुख आणि महत्त्वाचा उपाय म्हणजे मास्क हा आहे. मास्क हे देखील एक व्हॅक्सिनेशनच आहे. त्यामुळे कितीही लाटा आल्या आणि किती व्हेरायंट आले आणि त्याची लक्षणे देखील बदलली तरी मास्क ह्यावर उत्तम उपाय आहे.