सांगली : भाजप आमदार गोपीचंद पडळकर (BJP MLC Gopichand Padalkar) यांनी महिला अधिकाऱ्यांबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध करत पडळकर यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. जिल्ह्याच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षक या धुणे-भांड्याला जयंत पाटलांच्या घरी असल्यासारखे वागतात असे आक्षेपार्ह वक्तव्य पडळकर यांनी केले होते. या वक्तव्यचा निषेध करत धुणे भांडी करत असलेल्या महिलांच्या कामास व सर्व महिलांना हीन दर्जा देऊन संपूर्ण स्त्री वर्गाचा अपमान झाल्याची भावना यावेळी महाराष्ट्र घरकामगार मोलकरीन संघटनेच्या महिलांनी बोलून दाखवली. यासाठी महाराष्ट्र घरकामगार मोलकरीन संघटनेच्या सदस्यांनी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध आंदोलन देखील केले. तसेच देशातील मोलकरीन महिला आणि महिला पोलीस अधिकाऱ्यांचा अपमान करणाऱ्या आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर कारवाई करा अशी मागणी यावेळी करण्यात आली.


आमदार गोपीचंद पडळकर यांनी एका मुलाखतीमध्ये सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक  पालकमंत्र्यांच्या घरचे कामगार असल्यासारखे वागतात. तसेच अतिरिक्त पोलीस अधीक्षक या धुणेभांड्याला जयंत पाटलांच्या घरी असल्यासारखे वागतात असे वक्तव्य केलेले होते. हे वक्तव्य अत्यंत धक्कादायक आहे. कामगारांबद्दल व मोलकरीण महिलांच्याबद्दल अवमान करणारे गोपीचंद पडळकर यांचे वरील वक्तव्य आहे. अशा प्रकारे धुणे भांडी करत असलेल्या महिलांच्या कामास व सर्व महिलांना हीन दर्जा देऊन संपूर्ण स्त्री वर्गाचा अपमान आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेला आहे, असं संघटनेच्या सदस्यांचं म्हणणं आहे.


धुणे-भांडी करणे हे सन्मानाचे काम नाही काय? धुणे भांडी करणे म्हणजे हलक्या प्रतीचे काम आहे काय? धुणे-भांड्याला जयंत पाटलांच्या घरी असणे म्हणजे काय? असे सवाल करत या सर्व प्रकरणाची चौकशी होऊन आमदार  गोपीचंद पडळकर यांच्यावर शासनाने कडक कारवाई करावी अशी मागणी मोलकरीन संघटनेच्या वतीने करण्यात आली.


काय म्हणाले होते पडळकर
आमदार गोपीचंद पडळकर यांनी बॉडीगार्ड न स्वीकारण्याचा निर्णय घेत नोव्हेंबर महिन्यात आटपाडीत झालेल्या शिवसेना- राष्ट्रवादीच्या गटातील राड्याचा व्हिडीओ शेअर करत आटपाडीमध्ये माझ्यावर झालेला हल्ला सुनियोजीत होता असा दावा केला होता. या हल्ल्याच्या कटात जिल्ह्याचे एस.पी दिक्षित कुमार गेडाम, ॲडीशनल एस.पी मनिषा डुबुले आणि जिल्ह्याचे पालक मंत्री जयंत पाटील सामिल आहेत असाही आरोप केला होता. यांनी या कारवाईच्या नावाखाली माझ्या बॉडीगार्डलाच सस्पेंड केलं आणि उलट माझ्यावरच 307 अंतर्गत गुन्हा दाखल केला. एसपी आणि ॲडीशनल एसपी यांच्यावरचा विश्वास उडाल्यामुळे आपण बॉडीगार्ड न स्वीकारण्याचा निर्णय घेतल्याचे पडळकर यांनी म्हटलं होतं. रक्षकच जर भक्षकात सामील असतील तर त्यांच्यावरती कसा विश्वास ठेवायचा असे म्हणत सांगली पोलीस अधिकाऱ्यांच्या कारभारावर पडळकर यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha