Arjun Khotkar vs Raosaheb Danave : शिवसेना नेते आणि माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्या घरी ईडीची धाड पडल्यानंतर केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकर यांच्या मध्ये एक शीत युद्ध पाहायला मिळत आहे. काही दिवसांपासून दोघेही जाहीर व्यासपीठावरून एकमेकांविरोधात टीका करायची संधी सोडत नाहीत. आता याचाच पुढचा प्रत्यय जालना शहरातील चौकाचौकात पाहायला मिळतोय. दोन दिवसापूर्वी अर्जुन खोतकर यांचा वाढदिवस झाला. या वाढदिवसानिमित्त लावलेल्या बॅनरवर जालन्याचे फिक्स खासदार, भावी खासदार अशा प्रकारचा उल्लेख अर्जुन खोतकर यांच्या नावाआधी करण्यात आला आहे. त्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. 


शिवसेना नेते माजी मंत्री अर्जुन खोतकर आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचं नातं विळा आणि ओंबीच आहे. रावसाहेब दानवे यांना लोकसभा निवडणुकीमध्ये मदत केल्यानंतर मागील विधानसभा निवडणुकीमध्ये अर्जुन खोतकर यांचा अवघ्या काही मतांनी पराभव झाल्यानंतरही हे चित्र वारंवार पाहायला मिळालं. मध्यंतरी अर्जुन खोतकर यांच्या घरावर ईडीने छापा मारला. या छाप्यामागे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री असल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्यानंतर अनेक सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये अर्जुन खोतकर आणि रावसाहेब दानवे यांनी जालन्याच्या खासदारकी वरून एकमेकांना आव्हान दिले आहेत. त्यानंतर आता शहराशहरात अर्जुन खोतकर यांच्या वाढदिवसानिमित्त लावलेल्या बॅनरवर त्यांचा भावी खासदार फिक्स खासदार असा उल्लेख करण्यात आलेला आहे. जालना जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात या बॅनर वरून 2024 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये अर्जुन खोतकर विरुद्ध रावसाहेब दानवे अशी लढत पाहायला मिळेल ही चर्चा सुरू झाली आहे.


2019 च्या निवडणुका पूर्वी लहान बाळाचा वध अर्जुनाच्या बाणाने होईल अशी घोषणाच अर्जुन खोतकर यांनी केली होती. मात्र, शिवसेना नेते मी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्जुनाचा बाण भात्यातून ठेवायला लावला होता. आता गेल्या काही वर्षात पुलाखालून बरेच पाणी गेले आहे. शिवसेना आणि भाजपा या युतीत नाही त्यामुळे शिवसेनेचा कार्यकर्ता खोतकर यांच्याकडे भावी खासदार म्हणून पाहतो असल्याची चर्चा आहे. 


काँग्रेस जालन्याची जागा खोतकरांना सोडणार का?


शहरात एक अर्जुन खोतकर यांच्या वाढदिवसानिमित्त लावलेल्या बॅनरवरून शिवसेना कार्यकर्त्यांनी अर्जुन खोतकर यांना खासदारकीचे तिकीट घोषित केले आहे. पण शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांची आघाडी होण्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस गेल्या काही वर्षांपासून लोकसभा निवडणूक एकत्र लढवत आहे. या दोन पक्षांच्या निवडणूक जागा वाटपात ही जागा काँग्रेसच्या वाट्याला येते. खोतकरांसाठी काँग्रेस ही जागा सोडेल का? हा प्रश्न आहे. मागील 5 निवडणुकीमध्ये सलग काँग्रेसचा या मतदारसंघातून पराभव झाला आहे.


काँग्रेस नेते कैलास गोरंट्याल या बॅनरबाजीवर काय म्हणाले?


एका सार्वजनिक कार्यक्रमात काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी खास शेरोशायरी करत खोतकर यांच्या बॅनरवर प्रतिक्रिया दिली. कैलास गोरंट्याल यांनी बॅनरबाजी वरून शिवसेना नेते माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्यावर नाव न घेता टीका केली. काम न करता खासदारकीचं स्वप्न  पाहणे चांगलं नसतं असं म्हणत लोकांना भुलवण्यासाठी भावी खासदार म्हणावं लागत असा खोसक टोला त्यांनी लगावला. भावी खासदार म्हटलं नाही तर कार्यकर्ते पळून जातील त्यामुळे अशा प्रकारच बोलावं लागतं असंही सांगायला विसरले नाहीत. त्यामुळे जरी खोतकर यांच्या मनात असलं तरी काँग्रेस नेत्यांचा त्यांना अडसर ठरणार आहे.


राष्ट्रवादीची काय भूमिका?


तिकीट सोडण्यासाठी जशी काँग्रेसची भूमिका महत्त्वाचे आहे , तशी राष्ट्रवादीची देखील भूमिका महत्त्वाची आहे. मात्र ही जागाच आपल्याला वाट्याला नसल्यानं आणि शिवसेनेची जवळीक झाल्यानंतर ती जागा शिवसेनेला मिळावी यात राष्ट्रवादी काँग्रेसलाही रस असणार आहे. मात्र सध्यातरी राष्ट्रवादीचे नेते आणि जालन्याचे पालकमंत्र्यांनी याबाबत मौन बाळगले आहे, बॅनर लावणे ही कार्यकर्त्यांची भूमिका असते. कार्यकर्त्यांमध्ये उत्साह असतो, त्यामुळे अशा पद्धतीचा बॅनर लावलं जातं हे टोपे म्हणाले.


रावसाहेब दानवे काय म्हणाले?


केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी म्हटले की, मी यावर काही बोलणार नाही. कैलास गोरंट्याल हे बोलले आहेत .खोतकर हा मोठा माणूस आहे अशी प्रतिक्रिया केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी खोतकर यांच्या बॅनरबाजीवर दिली आहे.