पंकजा मुंडे यांची कालची फेसबुक पोस्ट आणि आज ट्विटर हॅण्डलच्या बायोमधून गायब असलेला भाजपचा उल्लेख, यामुळे त्या पक्ष सोडणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे. त्यातच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही पंकजा मुंडेच काय, राज्यातील अनेक बडे नेते शिवसेनेच्या संपर्कात असल्याचं सांगून खळबळ माजवली. त्यामुळे भाजपने पत्रकार परिषद घेऊन पंकजांबाबत केवळ अफवा सुरु असल्याचं स्पष्ट केलं.
पंकजा मुंडे काल, आज आणि उद्याही भाजपमध्येच
याबाब चंद्रकांत पाटील म्हणाले की, "पंकजा मुंडे भाजपशिवाय अन्य काही विचार करतील अशी चर्चा दोन दिवसांपासून सुरु आहे. अपघाताने आलेल्या सरकारचं मनातले मांडे खाणं चालू आहे. अशाप्रकारच्या बातम्यांचा कुठलाही अर्थ नाही. पंकजा ताईंशी आमचं बोलणं झालं आहे. त्या टप्प्याने या स्तरावर पोहोचल्या आहेत. त्या असा कोणताही विचार करु शकत नाहीत. या अफवा आणि बातम्या थांबाव्यात, यासाठी राज्याचा भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणून मी आपल्यासमोर बाजू मांडत आहे. पराभवानंतर कुठल्याही नेत्याची मानसिकता असते की आपलं काय चुकलं, आपण आत्मपरीक्षण करायला हवं. ती मानसिकता म्हणजे त्या वेगळा विचार करत आहेत असं नाही. त्या काल भाजपच्या नेत्या होत्या, आजही आहे आणि उद्याही. अपघाताने आलेलं सरकार किती दिवस टिकेल माहित नाही, त्यांच्या डोक्यातून नवनव्या कल्पना येत आहेत. पण त्या सत्यात उतरणार नाहीत."
तसंच "दरवर्षी 12 डिसेंबर हा गोपीनाथ मुंडेंचा जन्मदिन पंकजा ताई मोठ्या प्रमाणात साजरा करतात. आम्ही सगळे त्या कार्यक्रमाला जातो. एका वर्षी अमित शाह देखील आले होते. दरवर्षी देवेंद्र फडणवीस जातात, आम्हीही जातो. यावर्षीही आम्ही मोठ्या संख्येने जाणार आहोत," असंही चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.
फेसबुक पोस्टद्वारे पंकजा मुंडेंकडून कार्यक्रमाचं निमंत्रण
पंकजा मुंडेंशी माझं स्वत:चं बोलणं झालं. पंकजा ताईंनी 12 डिसेंबरच्या कार्यक्रमाचं आमंत्रण सहकार्य, अनुयायींना दिलेलं आहे. पंकजा ताईंची ठाकरे कुटुंबीयांशी जवळीक आहे. मुंडे-महाजन कुटुंबाचे ठाकरे कुटुंबाशी चांगले संबंध आहेत, परंतु याचा अर्थ त्या भाजप सोडून शिवसेनेत प्रवेश करतील अशी सूतराम शक्यता नाही. पंकजा ताईंच्या निष्ठेवर भाजपचा पूर्ण विश्वास आहे. पंकजा मुंडेंची फेसबुक पोस्ट ही 12 तारखेच्या कार्यक्रमाचं निमंत्रण आहे. उगाच चुकीचा अर्थ काढू नये. तसंच शिवसेनेच्या संपर्कात कोणी आहे, असं मला वाटत नाही, असं भाजपचे नेते विनोद तावडे यांनी स्पष्ट केलं.
पंकजा मुंडे पक्ष बदलण्याचा निर्णय घेणार नाही : प्रकाश महाजन
पंकजा मुंडे पक्ष बदलण्याचा निर्णय घेतील असं वाटत नाही, असा विश्वास त्यांचे मामा प्रकाश महाजन यांनी व्यक्त केला. ते म्हणाले की, "पराभवाचं शल्य त्यांच्या मनात नक्कीच आहे. कार्यकर्त्यांना सावरण्यासाठी त्यांनी फेसबुकवर लिहिलं असावं." तर संजय राऊत यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना प्रकाश महाजन म्हणाले की, "संजय राऊत हे वाच्यबृहस्पती आहेत."
संबंधित बातम्या